वर्षा गायकवाड यांचे बळ वाढणार
। मुंबई । प्रतिनिधी ।
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते नसीम खान गेल्या अनेक दिवासंपापासून नाराज होते. त्यांच्या या नाराजीनंतर काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून हरतर्हेने प्रयत्न केले जात होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता त्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत असून, यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नसीम खान यांची नाराजी आता दूर झाली आहे. आमीह बहुसंख्य आणि अल्पसंख्याक यांना सोबत घेऊनच पुढे जात आहोत, असे चेन्नीथला म्हणाले. त्यांनी इतर अनेक मुद्यांवर यावेळी भाष्य केले.
दरम्यान, नाराजी दूर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी प्रचारसमितीचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. काँग्रेसने माझ्या मागण्याची दखल घेतली आहे. त्यामुळे मी हा राजीनामा मागे घेतोय, असे नसीम खान म्हणाले आहेत. माझ्या इतर कार्यकर्त्यांनीही आपले राजीनामे मागे घ्यावेत, असे आवाहन नसीम खान यांनी केले आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढाई सोपी जाणार आहे.