| नाशिक | वृत्तसंस्था |
उमेदवारीच्या गोंधळामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार मिळालेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरविला आहे. येत्या (दि.29) एप्रिलला नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अधिकृतपणे अर्ज दाखल करतील. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या शुक्रवार (दि.26)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.
चार दिवसांवर उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत येऊन पोहोचली, तरी अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घ्यावी लागत आहे. महायुतीचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, ‘राष्ट्रवादी’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांची वेळ घेऊन एकत्रितपणे अर्ज सादर करण्याचे नियोजन आहे. परंतु, नाशिकचा उमेदवारच अद्याप निश्चित न झाल्याने महायुतीचा प्रचारही थंडावला. नेत्यांमध्ये मरगळ आली असून, कोणालाही उमेदवारी द्या; पण उमेदवार ठरवा, असे आवाहन स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. याउलट परिस्थिती महाविकास आघाडीत दिसून येते. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे व दिंडोरीत भास्कर भगरे यांची उमेदवारी अंतिम केल्याने प्रचारही सुरू आहे.
दोन्ही उमेदवार (दि.29) एप्रिलला शालिमार येथील शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचारफेरी काढतील. त्यानंतर एकत्रितपणे अर्ज सादर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. नेत्यांची वेळ मिळाली, तर गुरुवारी (दि. 2) अर्ज दाखल करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी ठेवली आहे.