नथुराम लोभींची प्रधान तंत्रज्ञ म्हणून बढतीसह बदली
| चौल | प्रतिनिधी |
महावितरणच्या चौल 1 विभागात कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळाऊ सहाय्यक लाईनमन नथुराम कृष्णा लोभी यांना प्रधान तंत्रज्ञ म्हणून बढती मिळाली असून, त्यांची बदली विभागीय कार्यालय चरी पळी येथे झाली आहे. त्यांच्या सन्मानार्थ चौल महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांच्यावतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम चौल येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी चौल विभागीय कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता रेणुका पत्की-कुलकर्णी या आवर्जून उपस्थित होत्या. सर्वप्रथम त्यांच्या हस्ते श्री. लोभी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, श्री. लोभींनी त्यांच्या कार्यकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वेळोवेळी दाखविलेली तत्परता, संकटसमयी उभं राहणं आणि गावाशी जोडलेली आपुलकी याबद्दल रेणुका पत्की-कुलकर्णी यांनी मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी चौल विभागातील महावितरणचे कर्मचारी अमोल राणे, प्रवीण शेळके, शीतल रायकर, विशाल कवळे, मंगेश मढवी, सूरज गावंड, वरुण ओरपे, धनंजय आरकिल्ले, साक्षी भोनकर, सिद्धांत खंडारे, सुधर्म मुकादम आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व सहकार्य कर्मचाऱ्यांनी लोभी यांच्या कार्याला मनापासून सलाम केला. संपूर्ण कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरलेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राणे यांनी केले. तर प्रवीण शेळके यांनी आभार मानले. त्यानंतर कर्यक्रमाचा समारोप झाला.







