राष्ट्रीय कबड्डीपट्टू काळाच्या पडद्याआड

| पेण । वार्ताहर ।

रायगड जिल्हयातील पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय बाबूराव म्हात्रे उर्फ गुरुजी यांच्या वयाच्या 72 व्या वर्षी वृध्दपकाळाने राहत्या घरी निधन झाले. विजय म्हात्रे यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अविरतपणे कबड्डीची सेवा केली. विजय म्हात्रे यांचे वडील बाबूराव म्हात्रे हे मुंबईला कामाला असताना मुंबई संघातून हुतूतू खेळत असत. खेळाचा उपजत वारसा विजय म्हात्रे यांना त्यांच्या वडीलांकडून मिळाला. विजय म्हात्रे यांचे प्राथमिक शिक्षण वढाव येथील प्राथमिक शाळेत झाले. कबड्डीची आवड त्यांना शालेय जीवनापासून होती. परंतू खर्‍या अर्थाने कबड्डीच्या व्यावसायिकतेकडे विजय म्हात्रे यांना नेण्यामागे विजू पेणकर यांचा मोठा वाटा आहे. जरी ते दिव गावचे असले तरी त्यांचा स्थानिक संघ हा काळभैरव बोर्झे हा होता. काळभैरव बोर्झे या संघात खेळतांना त्यांना अ.ज.ठाकूर, मोरेश्‍वर पाटील, म.प.म्हात्रे, र.हि.पाटील या त्यांच्या साथीदारांनी मोलाचे सहकार्य त्यांना केले. तर व्यावसायिक संघ म्हणून ते महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा संघातून खेळले. विजय म्हात्रे हे शिक्षक असल्याने त्यांना पुढे गुरुजी या नावानेच कबड्डी क्षेत्रात ओळखले गेले.

रायगड जिल्हयातील पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते म्हणून विजय म्हात्रे यांचा नाव लौकिक झाले. रायगडची कबड्डी सातासमुद्रा पलीकडे नेण्यामागे विजय म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. विजच म्हात्रे यांचा जन्म 31 डिसेंबर 1953 ला दिव या गावात झाला. तर आज कबड्डीचा एक पर्व आस्थाला गेल्याची भावना त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या क्रिडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बोलून दाखवले. विजय म्हात्रे यांच्यावर अंत्यसंस्कार दिव येथील स्मशानभूमीत झाले.

Exit mobile version