। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड-राजपुरी ग्रामपंचायतमधील डोंगरी गावातील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेत अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे विस्तार अधिकारी संजय शेडगे, उपसरपंच इस्माईल सिद्दीकी, हेमंत नाईक, शुभांगी नरमोड, अदानी फाउंडेशनच्या डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे, अवधूत पाटील, प्राजक्ता आडूळकर, आदिती नाईक, विजयता खेऊर, मदतनीस आणि महिला उपस्थित होत्या. जयश्री काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोषणाचे महत्त्व पटवून देत दैनंदिन जीवनात कुटुंबाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी महिलेची भूमिका आणि चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. आपले जेवणाचे ताट नेहमी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व आणि प्रथिनांची गरज भागवणारे असायला पाहिजे. कोकणात विविध रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात आणि ग्रामीण कुटुंब त्याचे पुरेपूर सेवन करतांना आढळतात. याबद्दल विशेष जनजागृती करणे तसेच भरड धान्य आणि कडधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी अदानी फाउंडेशन प्रयत्नशील आहे, असे मत जयश्री काळे यांनी केले.
इस्माईल सिद्दीकी यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिला व बालकांसाठी घेण्यात येणार्या उपक्रमाबद्दल अदानी फाऊंडेशनचे आभार मानले. तसेच, यावेळी डोंगरी गावातील महिलांसाठी पौष्टिक आहार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहन बक्षीस देऊन महिलांना गौरविण्यात आले.