पथनाट्यांनी वेधले लक्ष
| चणेरा | प्रतिनिधी |
औद्योगिक क्षेत्रासमोर भविष्यात अनेक संकटे उभी राहणार असून, त्यांचा सामना करण्यासाठी कामगार आणि उद्योगांनी सज्ज राहणे अत्यावश्यक आहे. सुरक्षा हीच सर्वांत मोठी जबाबदारी असून ती प्रत्येकाच्या हाती आहे, असे प्रतिपादन उद्योजक व आरआयएचे अध्यक्ष पी.पी. बारदेशकर यांनी केले. धाटाव येथील आरआयए सभागृहात आयोजित 55व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
4 ते 11 मार्चदरम्यान रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन, म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप आणि डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी हा सप्ताह साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच अध्यक्ष बारदेशकर यांच्या संकल्पनेतून पथनाट्य व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कामगारांनी सादर केलेली सुरक्षा विषयावरील पथनाट्ये अत्यंत प्रभावी ठरली आणि उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
बारदेशकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, औद्योगिक क्षेत्रात घडणाऱ्या अपघातांचे मूळ कारण समजून घेणे गरजेचे आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत उद्योगांना नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असून, सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. सजग कामगार बनणे आणि सुरक्षित वातावरण तयार करणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे, असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमात आरआयए सेफ्टी अवॉर्ड स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सुरक्षा जनजागृती भित्तीपत्रके आणि ‘शून्य अपघात’ साध्य करणाऱ्या कंपन्यांना पुरस्कार देण्यात आले.
यावेळी दयानंद नांदगावकर, नाथासाहेब कोळेकर, नीरजकुमार मिश्रा, प्रसाद देशमुख, मुरगन, सुदाम करपे, राजेश खांडेकर, प्रकाश शेटे, राजेश हजारे, अरुण माने, वैभव नाईक, डॉ. शैलेश नकाते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात दयानंद नांदगावकर यांनी सादर केलेली सुरक्षेवरील कविता, सुदर्शन युनिट 2 चे महिला सुरक्षा विषयक सादरीकरण आणि रोहा डायकेमच्या कामगारांचे गायन पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. सूत्रसंचालन रणजीत गायकवाड व राजेश खांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश हजारे यांनी मानले.







