सावर्डे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

जीवनाच्या यशस्वीतेसाठी मैदानी खेळ पूरक : महेश महाडिक
चिपळूण | वार्ताहर |
हॉकी या खेळाचे जादूगार, सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा सन्मान म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचे हॉकी खेळाचे कौशल्य अफलातून होते.त्यामुळे भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील दिग्गज खेळाडूसुद्धा त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडले होते. चेंडूवरील नियंत्रण ही त्यांची खासियत होती. सांघिक खेळ संघ भावनेनेच खेळले पाहिजेत, असे त्यांचे मत होते. म्हणून मैदानी खेळच मानवी जीवन यशस्वी करण्यासाठी पूरक आहेत, असे मत सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक यांनी व्यक्त केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक सावर्डे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव महेश महाडिक यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे, अमृत कडगावे, रोहित गमरे, जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरीचे जिम्नास्टिक राज्य प्रशिक्षक सचिन मांडवकर तसेच हणमंत घाडगे उपस्थित होते.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे यांनी 2002 पासून आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तुत्व दाखवणार्‍या व निवृत्तीनंतरही खेळाच्या समृद्धीसाठी आयुष्य खर्ची घालणार्‍या खेळाडूला ध्यानचंद जीवन गौरव या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने गौरविले जाते याची माहिती देऊन मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाविषयी आणि ऑलिंपिकमधील भारत या विषयावर ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुगल फार्मच्या मदतीने विद्यार्थ्यांची क्रीडाविषयक सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी अमृत कडगावे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे घोषित केले.

Exit mobile version