| उरण | प्रतिनिधी |
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. सुरुवातीस जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर प्रकाश टाकताना भारताच्या युवकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत म्हणून विवेकानंदांकडे पाहतो, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करून महापुरुषांच्या विचारांचे चिंतन व मांडणी केली पाहिजे, असे प्रतिपादन केले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. एम.जी. लोणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करून स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण मिशनचे कार्य स्पष्ट केले. तर राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्यावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी प्रकाश टाकला. सुराज्य उभारणीत जिजाऊंचे योगदान विशद केले. यावेळी आयक्युऐसी कॉर्डिनेटर डॉ.ए.आर. चव्हाण, सहयोगी प्राध्यापक व्हि.एस इंदुलकर, कार्यालयीन अधीक्षक तानाजी घ्यार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







