नैसर्गिक शेती काळाची गरज

कृषीतज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी यांचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन


| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

शेतकर्‍यांनी रासायनिक शेतीत बदल करून नैसर्गिक शाश्‍वत शेतीची कास धरावी, असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी यांनी केले. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत किल्ला विज्ञान केंद्र किल्ला रोहा रायगड व कृषी मित्र संघटना सुधागड यांच्या माध्यमातून राबगाव ग्रामपंचायत येथे दि.(25) रोजी परिसंवादात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ‘नैसर्गिक शेती’ या विषयावर कृषी तज्ज्ञ, कृषी संशोधक आदींनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू यांच्या मान्यतेने शास्त्रीय सल्लागार समिती सदस्य म्हणून पाली सुधागड येथील शेतकरी शरद गोळे यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

यावेळी नैसर्गिक शेती पद्धती विशेषज्ञ डॉ प्रमोद मांडवकर, डॉ नामदेव म्हसकर, डॉ राजेश मांजरेकर, कार्यक्रम समनव्यक डॉ मनोज तलाठी, पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, तालुका कृषी अधिकारी जनाबा झगडे, सरपंच श्रीमती कविता वाळंज, सुधागड कृषी मित्र संघटना सचिव शरद गोळे, डॉ उत्तम महाडकर, जीवन आरेकर, माधुरी भोईर, बशीर परबलकर आदींसह मान्यवर व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकात डॉ. प्रमोद मांडवकर यांनी सांगितले की आजच्या शेती व पीक लागवडीत खतांचा, बी बियाणे, रसायनांचा अतिरिक्त वापर होतोय, याचा शरीरावर विपरीत परिणाम होतात. नैसर्गिक शेती करणे काळाची गरज आहे. अन्नधान्यातील घटक हे विविध आजार व विकार निर्माणास कारणीभूत आहेत. येणारी पिढी निरोगी व सुदृढ व्हायची असेल, तर सकस व जीवनसत्वयुक्त आहार त्यांना दिला पाहिजे, असे सांगितले.

डॉ. मनोज तलाठी यांनी सांगितले की, सद्यस्थितीत अवाजवी व अतिरिक्त रसायनांनी शेतीचा कस बिघडला. विषयुक्त अन्नाचा आहार आपण घेतोय, आता आपल्याला विषमुक्त अन्न खायचे आहे, अन्न पौष्टिक, सात्विक व सकस आहार मिळणे गरजेचे आहे. हे नैसर्गिक शेतीतून अन्न उपलब्द होते. नैसर्गिक शेती करताना जमीन नांगरू नये, चक्रीकरण करावे, खते स्वतः तयार करा, पाण्याचे नियोजन वाफसा पद्धतीने केले पाहिजे. रोग व किडीचे उच्चाटन करण्यासाठी उच्च प्रतीचे शेतीतून व घरच्या घरी कीटकनाशके तयार केले पाहिजेत. पारंपरिक व गावठी बियाणे वापरात आणावीत. शास्त्रीय जोड देऊनच नैसर्गिक शेती केली जाते. झिरो बजेट शेती करण्यावर भर द्यावा.

डॉ. नामदेव म्हसकर सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की नैसर्गिक शेती निसर्गाचे तत्व अवलंबून केली जाते. शेतीमध्ये शास्त्र दडलेले आहे.कृषी विद्यापीठात शेतीविषयक प्रशिक्षण दिले जाते. शेतीला शास्त्राला जोडून तत्वाला अनुसरून शेती केली तर अधिक लाभदायक ठरते. शेती शाश्‍वत ब उत्पादन क्षम ठेवायची असेल तर आपल्याला शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. एकेकाळी भूकबळी चे केंद्र ठरलेला देश आज अन्न धान्य निर्यात करीत आहे हे येथील शेतकरी बांधवांच्या कष्टाचे फळ आहे. भारतात सन 2004 पासून सेंद्रिय शेतीचा संशोधनात्मक कार्यक्रम सुरू झाला. 17 ते 18 केंद्र देशभरात सेंद्रिय शेतीचे केंद्र निर्माण झाले आहेत. शेतकर्‍यांना उत्पन्न वाढवायचे असेल तर उत्पादन वाढवले पाहिजे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी नैसर्गिक शेती चा सर्वोत्तम पर्याय आपण स्वीकारला पाहिजे , असे डॉ. म्हसकर म्हणाले.

शेतकर्‍यांनी एकपिकी शेती न करता विविध पिक शेती केली पाहिजे. शेतीला दुग्ध पालन, कुकुट पालन , आळंबी आदी जोड व्यवसाय केल्यास त्यातून अधिक उत्पादन व नफा मिळवू शकतो. असे यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले.

डॉ. राजेश मांजरेकर यांनी सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले. जागतिक स्थरावर वातावरण व तापमानात होत असलेले बदल, भरती ओहटी, पूरपरिस्थिती, दुष्काळ, ज्वालामुखी उद्रेक, पर्यावरण चक्र, यावर विश्‍लेषण करून त्याचे शेतीवर होणारे दूरगामी परिणाम स्पष्ट केले. नैसर्गिक शेतीत देशी बियाणांचा वापर केला पाहिजे, ट्रॅक्टर ने खोलवर नांगरणी न करता लाकडी नांगराने नांगरणी करणे अधिक उपयुक्त ठरते. हिरवळीचे व सेंद्रिय खत वापरली पाहिजे. जिवामृताचा वापर जमिनीतील सुश्म जिवाणू वाढविले पाहिजे. एकूणच आधुनिक शेतीमध्ये बदल करून नैसर्गिक शेतीची कास धरावी असे सांगितले.

यावेळी तरुण शेतकरी संतोष बावधाने यांनी शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले. कुणीही शेती विकू नका, शेती वाचवा असा संदेश बावधाने यांनी दिला. तसेच शेतकरी सटूराम दळवी यांनी भातशेतीतील पूरक बाजू समजावून सांगितली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शरद गोळे व माधुरी भोईर यांनी केले.

Exit mobile version