रासळ येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

केंद्र शासनाच्या नैसर्गिक शेती धोरणास अनुसरून कृषी विज्ञान केंद्र किल्ला व रोहामार्फत सुधागड तालुक्यातील रासळ येथे नैसर्गिक शेतीची तत्वे आणि कार्यपद्धती या विषयावर नुकताच एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर, डॉ. राजेश मांजरेकर व शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य शरद गोळे यांनी मार्गदर्शन केले.

शरद गोळे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा विषद केली. प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर मांडवकर यांनी शेतीची सद्यस्थिती पर्यावरणातील बदलत्या घटकांचा शेतीवर होणारा परिणाम व भविष्यकालीन उपयोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. राजेश मांजरेकर यांनी नैसर्गिक शेतीची नावे व कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन करताना शेतीमध्ये बिजामृत, जीवामृत, घन जीवामृत, गांडूळ खत, दशपर्णी अर्क व वापसा स्थिती या गो आधारित शेती पद्धतीमधील घटकांविषयी माहिती दिली. यानंतर कृषी अधिकारी अशोक महामुनी यांनी सुधारित शेती तंत्रज्ञान व समूह शेती विषयक मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना रासळ सरपंच प्रणिता खाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन तंत्राचा अवलंब करण्याविषयी आवाहन केले. हिरकणी बचत गट महासंघाच्या विद्या सावंत यांनी या कार्यक्रमाची आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी यांनी तसेच कृषी मित्र संघटना, सुधागड पालीचे सर्व संचालक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

या कार्यक्रमास रासळ ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिता खाडे, ग्रामपंचायत सदस्या कांचन यादव, सविता मस्के त्याचप्रमाणे पंचायत समिती सुधागडचे कृषी अधिकारी अशोक महामुनी व विस्तार अधिकारी श्री. देवकर, महिला हिरकणी ग्रामसंघ अध्यक्ष विद्या सावंत, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खाडे, भरत देसाई हे मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version