पाच हजार ठिकाणी घटस्थापना
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात नवरात्रौत्सवाचा जल्लोष नऊ दिवस पाहावयास मिळणार आहे. पाच हजार 106 ठिकाणी विधीवत पूजा करून घटस्थापना केली जाणार आहे. त्यामध्ये 1 हजार 387 दुर्गा मूर्ती आणि 192 प्रतिमांचा समावेश आहे. नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नऊ दिवस धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम ठिकठिकाणी साजरे होणार आहेत.
गणरायाच्या निरोपानंतर जिल्ह्यामध्ये नवरात्रौत्सवाचे वेध लागले होते. घरोघरी सजावट करण्याची लगबग सुरु झाली होती. महिलांसाठी नवरात्रौत्सव महत्वाचा मानला जातो. देवीच्या स्वागतासह पुजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारात गर्दी झाली होती. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असतानादेखील भक्तांनी त्यावर मात करीत मोठ्या उत्साहाने देवीच्या स्वागतासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यावर भर दिला. सोमवार (दि.22) पासून जिल्ह्यात नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी विधीवत पूजा करून घट स्थापन केले जाणार आहे. एकूण पाच हजार 106 ठिकाणी घट स्थापन केले जाणार आहेत. त्यात सार्वजनिक एक हजार 617 व तीन हजार 489 ठिकाणी खासगी घट स्थापन केले जाणार आहेत. यंदाही घट स्थापनेसह काही मंडळाच्या वतीने देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. एकूण एक हजार 387 मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. शहरातील जागृत देवस्थान असलेल्या काळंबादेवीच्या दर्शनासाठी अफाट गर्दी होणार आहे. या ठिकाणी खाद्य पदार्थांसह खेळणी पुजेचे साहित्यांची दुकाने सजली जाणार आहे. त्यामुळे नऊ दिवस याठिकाणी उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.
जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात गावागावात नाक्यानाक्यावर नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. दांडिया, गरबासह वेगवेगळे उपक्रम या कालावधीत राबविले जाणार आहेत. लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, चमचा गोठी अशा अनेक स्पर्धा होणार आहेत. तसेच काही ठिकाणी जाखडी हे पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. काही ठिकाणी कबड्डी, कुस्ती स्पर्धादेखील भरविल्या जाणार आहेत. गुरुवारी (दि.02) ऑक्टोबरला दुर्गा विसर्जनासह विजयादशमी(दसरा) साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी रावणाचा दहन केला जाणार आहे. तीन ठिकाणी दहनाचा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे यंदाची शारदीय नवरात्र फक्त नऊ दिवसांची नसून पूर्ण दहा दिवसांची असणार आहे.
महिलांच्या सुरक्षेवर भर
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने दांडिया, गरबा सारखे नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. या कालावधीत महिलांची गर्दी होणार आहे. हा उत्सव आनंदात साजरा करता यावा, यासाठी पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कडेकोट पहारा ठेवला जाणार आहे. पोलीस दलासह होमगार्डच्या मदतीने बंदोबस्त ठेवला जाणार आहे. साध्या गणवेशात पोलीस तैनात राहणार असून महिलांच्या सुरक्षेवर भर दिला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.






