जयगडमधील नवेद 2 नौका बेपत्ता

संदेशानंतर घटनास्थळाच्या परिसरात पाहणी
अद्यापही तपासणी निकालशून्य
स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जयगड येथील बेपत्ता नवेद 2 या मच्छीमारी नौकेच्या बेपत्ता प्रकरणी, बंदरामध्ये येणार्‍या मालवाहू जहाजाकडून संदेश मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेने चार नॉटीकल मैल अंतरावर जाऊन तपासणी केली, तेव्हा काहीच आढळले नसल्याचे पुढे येत आहे.
जयगड परिसरातील खासगी कंपनीच्या बंदरावर कोळसा घेऊन येणारे जहाज समुद्रातून येत होते. चार नॉटीकल मैल अंतरावर काहीतरी समुद्रात दिसल्याचा संदेश जहाजावरुन प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून घटनास्थळाच्या परिसरात पाहणी करण्यात आली. किनार्‍यापासून जहाजाकडून सांगितलेला भाग जवळच असल्याने काही मच्छीमारांकडूनही चाचपणी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावेळी अपघात झाल्याचे पाण्यामध्ये काहीच दिसून आले नव्हते.
जयगड येथील नवेद 2 ही नौका बेपत्ता झाल्याच्या घटनेला दहा दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे; परंतु त्याचा शोध लागलेला नाही. एक मृतदेह वगळता अन्य काहीच हाती न लागल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नवेद या नौकेला मालवाहू जहाजाची धडक बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बेपत्ता नौकेबाबत जयगड पोलिस याचा कसून तपास करत आहेत. मच्छीमारांनी व्यक्त केलेल्या संशयाचीही शहनिशा केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अवशेषही मिळालेले नसल्याने नवेद 2 नौका बेपत्ता कशी झाली, याबाबतचे गुढ दिवसेंदिवस वाढत चाललले आहे.

Exit mobile version