नवघर शाळा रायगड जिल्ह्यात तृतीय

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद नवघर शाळेस ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात रायगड जिल्ह्यात प्राथमिक विभागात तृतीय क्रमांक मिळाला आहे. हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल नवघर शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

राज्य शासनाच्या शालेय विभागाच्यावतीने संपूर्ण राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान दिनांक 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा जिल्हा परिषद शाळा व खासगी अनुदानित शाळा अशा दोन विभागात घेण्यात आली. सुधागड गटातून प्रथम क्रमांक प्राप्त करून नवघर शाळा जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली होती. जिल्हा स्तरीय मूल्यमापन कमिटीने नवघर शाळेचे प्रत्येक उपक्रमनिहाय विद्यार्थ्यांशी संवाद साधून मूल्यांकन केले. त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद नवघर शाळेने बाजी मारून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटात रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सूर्यकुमार राव, नागमणी राव, सादूराम बांगारे, नवनाथ साबळे, राकेश जाधव, सर्व सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी व्यक्ती, ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे, प्रमोद म्हात्रे, संगीता बैकर, वृषाली गुरव, शीतल पाटील, अर्चना ठाकरे, अशोक कुवर, अंकिता जाधव आणि शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली.


राज्य शासनाने संपूर्ण राज्यात राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी होऊन शाळेने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. याचा शाळेचा मुख्यध्यापक म्हणून मनस्वी खुपच आनंद होत आहे. तसेच, सर्व शिक्षक सहकार्‍यांचे व विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद.

अनिल राणे
मुख्याध्यापक, शाळा नवघर
Exit mobile version