| उरण | विठ्ठल ममताबादे |
नवी मुंबई विमानतळावरून नियमित उड्डाणे सुरू करण्याची घोषणा होत असताना, या विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे. नोकऱ्या नसल्याने प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आचारसंहितेचे कारण पुढे करून भूमिपुत्रांच्या अस्मितेच्या लक्ष्याला स्थगिती दिली जाते, मात्र विमान कंपन्यांचे उद्घाटन सोहळे, जाहिरातबाजी आणि उड्डाणांची तयारी यांना आचारसंहिता लागू होत नाही, हा सरळसरळ दुटप्पीपणा असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
नवी मुंबई विमानतळासाठी भूमिपुत्रांच्या जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या असतील, तर त्या बदल्यात मिळणाऱ्या नोकऱ्या व व्यवसायही कायमस्वरुपीच मिळाले पाहिजेत. खासगी एजन्सीमार्फत कंत्राटी कामगार भरती करून भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा भुमिपूत्रांकडून देण्यात आला आहे.
याबाबत प्रकल्पग्रस्तांनी एक संतप्त सवालही उपस्थित केला आहे. ज्यांच्या संघर्षांमुळे नवी मुंबई उभी राहिली, ते लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव भूमिपुत्रांकडून प्रस्तावित आहे. त्यांचे नवी मुंबई विमानतळाला कधी लागणार? उद्घाटन झाले, उड्डाणे सुरू होत आहेत. मात्र नामकरणाच्या बाबतीत शासन मुद्दाम टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
नामकरणासाठीची अस्मितेची लढाई आचारसंहिता संपल्यानंतर अधिक तीव्रतेने उभी राहीलच. मात्र किमान नवी मुंबई विमानतळावरील कामगार भरतीत तरी भूमिपुत्रांची फसवणूक होऊ नये, यासाठी भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे, ही मोहीम तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता विमानतळ सुरु झाल्याने प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचा विश्वासघात झाला आहे.
नवी मुंबईकरांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. नोव्हेंबरपासूनच अनेकांनी पहिल्या प्रवासासाठी तिकीट आरक्षण करून हा दिवस डोळ्यांत साठवून ठेवला होता. विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विकसक, प्रकल्पग्रस्त कुटुंबे आणि विविध क्षेत्रांतील नागरिक कुटुंबियांसह या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना प्रत्यक्ष उड्डाणापर्यंत नेण्याचा सुमारे 25 वर्षांचा प्रवास आज पूर्णत्वास गेला, याचे समाधान अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे असा संघर्षाचा प्रवास ऐतिहासिक असल्याने खास प्रकल्पग्रस्तांना आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या जमीन त्यागावर हे विमानतळ उभे राहिल्याची भावना यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत काही क्षणासाठी येथे घोषणाबाजी केली. समजूत काढल्यानंतर प्रकल्पग्रस्तांपैकी प्रवाशांना विमानतळ परिसरात प्रवेश देण्यात आला.
सकाळी आठ वाजता बंगळुरूहून आलेले 6 ई 460 विमान धावपट्टीवर उतरले असता जलतोफांच्या सलामीने त्याचे स्वागत करण्यात आले. हा क्षण अत्यंत भावूक आणि आनंददायी असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. त्यानंतर सकाळी 8.40 वाजता 6 ई 882 हे विमान हैदराबादसाठी रवाना झाले. पहिल्या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी अनेकांनी परतीची तिकिटेही काढली होती.
