केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तयारी सुरू
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 30 सप्टेंबरला उद्घाटन होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विमानतळ उद्घाटनाच्या अनुषंगाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून सुमारे 450 सुरक्षा रक्षक आणि कमांडंट तैनात करण्याच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर हालचालींना वेग आला आहे.
पनवेल तालुक्यातील उलवे येथे सुमारे 1,100 हेक्टरवर देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ असलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत आहे. जुलै महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाचा पाहणी दौरा केला होता. त्या वेळेस 30 सप्टेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी अखेरची मुदत विमानतळाचे काम करणाऱ्या सिडको आणि अदाणी कंपनीला दिली होती. तेव्हापासून युद्धपातळीवर विमानतळाचे काम सुरू होते. आता हे काम पूर्णत्वास आले असून, विमानतळावरील पहिल्या टर्मिनल इमारतीच्या अंतर्गत सजावटीचे कामही आटोपले आहे. धावपट्टीसह टॅक्सीवे आणि इतर मार्ग यापूर्वीच सज्ज होते. त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांनी तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 15 ते 22 सप्टेंबर दरम्यान 918 सुरक्षा रक्षक आणि 12 गस्टेड ऑफिसर उपलब्ध केले जाणार आहेत. एक कमाडंट आणि दोन असिस्टंट कमाडंट यांच्यामार्फत देखरेख केली जाणार आहे. एपीएस-1 आणि एपीएस-2 या रँकचे सुमारे 484 रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीतर्फे (बीसीएएस) सर्व सुरक्षा दलांना सुरक्षेबाबतची नियमावली 15 सप्टेंबरपासून देण्यात येणार आहे. 30 सप्टेंबरला उद्घाटन झाल्यानंतर 25 ऑक्टोबरपासून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 30 सप्टेंबरला उद्घाटनावेळी इंडिगो आणि अकासा एअर या दोन विमान कंपन्यांना पहिले विमान उडवण्याचा मान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात देशाअंतर्गत प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय आणि मालवाहतूक सेवा सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.






