एक लाख जणांचा प्रवास
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक सेवा सुरू झाल्यानंतर केवळ 19 दिवसांत एक लाख प्रवाशांचा टप्पा पार केला. आता हवाई प्रवासाची मागणी वाढत आहे. या विमानतळावरून 12 जानेवारीपर्यंत 1,09,917 जणांनी प्रवास केला. यामध्ये 55,934 आगमन प्रवासी आणि 53,983 प्रस्थान प्रवाशांचा समावेश आहे. 10 जानेवारी रोजी सर्वाधिक 7,345 जणांनी येथून प्रवास केला. विमानतळावरून 734 ‘एअर ट्रॅफिक मुव्हमेंट’ हाताळण्यात आल्या. त्यामध्ये 32 जनरल एव्हिएशन फ्लाइट्सचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी बॅगेज हाताळणी यंत्रणा अधिक प्रभावी ठरली आहे. या काळात 40,260 आगमन बंगा आणि 38,774 प्रस्थान बेंगा यशस्वीरित्या हाताळण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. नवी मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागातही सकारात्मक सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत 22.21 टन मालवाहतूक करण्यात आली. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने दिल्ली, गोवा आणि बंगळुरू ही प्रमुख ठिकाणे आहेत. आधुनिक पायाभूत सुविधा, सुलभ प्रक्रिया आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेवर भर देत टप्प्याटप्प्याने सेवा विस्तार केला जात असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईहून चंडीगडसाठी उड्डाण केलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाला चंदिगड विमानतळावर दाट धुके असल्यामुळे पुन्हा मुंबईत उतरवण्यात आले. त्यामुळे या विमानातील 180 प्रवासी पाच तास विमानातच होते. सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी या विमानाने चंडीगडसाठी उड्डाण केले. हे विमान सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी चंडीगडच्या शहिद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. त्या विमानतळावर दाट धुके असल्यामुळे दृष्यमानता शून्य होती. परिणामी वैमानिकाला विमान उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे वैमानिकाने हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवले आणि दुपारी 2 वाजून 19 मिनिटांनी हे विमान मुंबईत उतरले.






