वायू दलाच्या लढाऊ विमानाची लवकरच चाचणी
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणीची जोरदार तयारी सुरू आहे. 11 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी ही चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी प्रत्यक्ष पाहणीसाठी निवडक मान्यवर आणि पत्रकारांना बसण्यासाठी विशेष मंडपाची सोय करण्याचे काम सुरु आहे.
सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्याकडे सिडकोची सूत्रे हाती असताना विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. सिडको मंडळाला तीन महत्वाचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मार्गी लावायचे होते. या तीन प्रकल्पांमध्ये 26 हजार महा गृहनिर्माण प्रकल्पाची सोडत, खालापूर येथील इरशाळवाडी येथे आदिवासी बांधवांना घरांचे वाटप आणि सर्वात महत्वाचा प्रकल्प हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांच्या चाचण्या हे तीन प्रकल्प आहेत. धावपट्टीवरील चाचणीमध्ये हवाई दलाचे सूखोई हे विमान धावपट्टीपासून काही अंतरावर उडणार आहे. तसेच अन्य दुसर्या विमानाचे प्रत्यक्ष विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरले जाणार आहे.