नवी मुंबई देशातील संस्कृतीचे केंद्र

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई शहरात भारतातील विविध राज्यातून आलेले देश बांधव वास्तव्यास आहेत. या शहरात सर्वच राज्याची ओळख निर्माण करून देणार्‍या वास्तू आहेत. त्या वास्तूमध्ये कला, संस्कृती, परंपरा जपणारे विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे नवी मुंबई शहर देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे केंद्र असल्याचे गौरवोद्गार राज्याचे विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी काढले.

नवी मुंबई फेस्ट-2023 हा महाराष्ट्रातील पहिला 29 राज्यांचा सहभाग असणारा राष्ट्रीय महोत्सव असून 29 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन नार्वेकर यांच्या हस्ते सीबीडी-बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, ठाकरे गटाचे नेते विठ्ठल मोरे, आर.के. म्हापत्रा, दिलीप घाटोले, ललित पाठक, संजय मिश्रा, शहनवार हुसेन, गौतम चक्रवती, कैलास उदयचंद आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवामुळे भारताची एकात्मता जपली जात आहे. उद्घाटनप्रसंगी देशातील विविध राज्यातून आलेल्या सदस्यांनी आपल्या राज्यातील बोली भाषेतून सर्वांचे स्वागत केले. नार्वेकर म्हणाले की, नवी मुंबईसारख्या विकसित शहरात अशा प्रकारेच्या महोत्सवाचे आयोजन नियमित व्हायला हवे. नवी मुंबई शहराने कला, संस्कृती जपत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या प्रमाणे शहराला लाभलेल्या वास्तूंपैकी एक महत्त्वपूर्ण अशा नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक वास्तूचे नार्वेकर यांनी कौतुक केले. एकप्रकारे विधीमंडळासारखी ही वास्तू असल्याचे सांगत अशा वास्तूच्या जडणघडणीत मेहनत घेणार्‍या राजकीय नेत्यासह सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version