|रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
मंजूर केलेल्या बिलातून टक्केवारीच्या 42 हजार रुपयांची लाच घेणारा नवी मुंबई महानगरपालिकेचा उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात अडकला. नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवारी दि. 21)सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ पकडून ही कारवाई केली.
तक्रारदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ . कैलास सोमनाथ गायकवाड असे या लाचखोर उपायुक्त असे नाव असून तो नवी मुंबई महानगरपालिकेत अतिक्रमण विभागामध्ये कार्यरत होता. तक्रारदार यांनी अतिक्रमण विभागाच्या केलेल्या कामाचे बिल उपायुक्त गायकवाड यांनी मंजूर केले होते. मंजूर केलेल्या 21 लाख एक हजार 357 रुपयांचे दोन टक्के प्रमाणे 42 हजार रुपयांची लाच गायकवाड यांनी मागितली होती.याप्रकरणी तक्रारदार यांनी नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपाधीक्षक धर्मराज सोनके यांनी तात्काळ पडताळणी केली.त्यामध्ये गायकवाड यांनी 42 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. अखेर सापळा रचण्यात आला.
मंगळवारी (दि. 21) सायंकाळी नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर येथील गायकवाड यांच्या कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले .याप्रकरणी कैलास गायकवाड यांच्या विरोधात एन.आर.आय .सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
