क्विक रिस्पॉन्स देण्यात नवी मुंबई पोलीस राज्यात नंबर वन

तक्रारनिवारणासाठी 112 क्रमांकाचे हेडक्वार्टर नवी मुंबईत
। पनवेल । वार्ताहर ।
तक्रार निवारणासाठी 112 हा क्रमांक नव्याने कार्यान्वित करण्यात आला असून त्याचे हेडक्वार्टर नवी मुंबईत आहे. ज्या नागरिकांच्या तक्रारी महाराष्ट्रातून 100 नंबरला येत असत त्या आता 112 नंबरवर येतील. 112 क्रमांकावर तक्रार आली की काही सेकंदात ती संबंधित विभागातील पोलिस स्टेशनला जाते. तक्रार आल्यानंतर ज्या व्यक्तीची तक्रार आहे त्याच्याशी संपर्क करून तक्रार निवारण करण्यात येते. अशा प्रकारे क्विक रिस्पॉन्स टाईम देण्यात नवी मुंबई पोलीस राज्यात प्रथम असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी केले. ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत सांप्रदायिक सलोखा चर्चासत्र या कार्यक्रमादरम्यान गुरुवारी (दि.10) पनवेलमध्ये बोलत होते.

यावेळी परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, विविध सांप्रदायिक प्रतिनिधी, परिमंडळ 2 हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, राजकीय व्यक्ती, समाजसेवक, जेष्ठ नागरिक, महिला, तरुण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात समाजासाठी योगदान देणार्‍या संस्थांचा, व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कोव्हिड काळात नवी मुंबईमध्ये झालेले काम स्तुत्य आहे. भविष्यातही नवी मुंबई राज्यात कायम अग्रेसर राहील. महिलांच्या विरोधातील अत्याचाराचे जे गुन्हे आहेत त्यांचे 100 टक्के डिटेक्शन केले आहे. महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरीकांच्या बाबतीत नवी मुंबई पोलिस सतर्क आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात महीलांविरोधतील कोणतेही गुन्हे घडलेले नाही. आणि गुन्हांमध्ये फारशी वाढ नाही, असेही सुरेश मेंगडे म्हणाले.

राजकारणामुळे जाती धर्मात तेढ निर्माण होते. समाजात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे आहे. सामाजिक शांतता बिघडवण्याचे कोणी काम करत असेल तर अशा समाजविघातक प्रवृत्तीची तक्रार पोलिसांकडे द्यावी असे आवाहन करतो.

शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2


Exit mobile version