। पनवेल । वार्ताहर ।
दुबईतील आबुधाबी येथे मँग्रोव्ह अॅक्शन प्रोजेक्ट्स फोटो पुरस्कारांतर्गत भरविण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार श्रीकुमार कृष्णन यांनी काढलेल्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबईतील तलाव आणि फ्लेमिंगोंचे नयनरम्य दृश्य असलेले हे छायाचित्र संयुक्त अरब अमिरातीतील मनारत अल सादियात या अग्रगण्य आर्ट गॅलरीमधील छायाचित्रण प्रदर्शनात 2 डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रदर्शित केले जाईल.
आबुधाबीतील पर्यावरण संस्था मँग्रोव्ह अॅक्शन प्रोजेक्ट आणि आबुधाबी मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह यांच्या पुढाकाराने आबुधाबी सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग व युनेस्कोने मिळून जागतिक पातळीवरील खारफुटी आणि सागरी जनजीवन याबद्दल चर्चा व जनजागृती करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय खारफुटी संवर्धन आणि पुनर्स्थापन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून छायाचित्रांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनात जगभरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या छायाचित्रकारांचा समावेश असणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार श्रीकुमार कृष्णन हे नवी मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहेत. श्रीकुमार कृष्णन हे छायाचित्रकारासोबतच पर्यावरणवादी कार्यकर्तेदेखील आहेत. नवी मुंबईतील फ्लेमिंगो आवास अबाधित रहावा यासाठी ते कार्यरत आहेत. आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून नवी मुंबईतील पर्यावरणाचे मुद्दे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडल्यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून कृष्णन यांचे कौतुक केले जात आहे.
फ्लेमिंगोंची समस्या जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न
दरवर्षी दीड लाखाहून अधिक फ्लेमिंगो नवी मुंबईत येत असतात; मात्र त्यांना आश्रय देणारे नवी मुंबईतील तलाव आणि खारफुटीची जंगले काही खासगी विकसकांना देण्याचा प्रशासनाने घाट घातला आहे. नवी मुंबईतील पर्यावरण आणि फ्लेमिंगोंचा अधिवास वाचविण्यासाठी विविध सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटना लढा देत आहेत. त्यामुळे हा मुद्दा जागतिक पातळीवर चर्चीला जावा आणि सर्व जगाचे लक्ष नवी मुंबईतील या समस्येकडे वेधले जावे म्हणून या परिषदेत हे छायाचित्र प्रदर्शित होणे गरजेचे असल्याचे मत श्रीकुमार कृष्णन यांनी मांडले आहे.