पालिकेकडून पाण्याचे नियोजन
| नवी मुंबई | वार्ताहर |
नवी मुंबई शहराच्या काही भागांत जाणवणाऱ्या पाणी तुटवड्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे. सुयोग्य पाणीपुरवठ्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सिडकोबरोबर 15 एमएलडी पाण्याच्या देवाणघेवाणीतून नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आगामी काळात सिडको व नवी मुंबई महापालिका पाण्याच्या आदानप्रदानातून शहरातील काही भागातील पाण्याची ओरड थांबण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोरबेतील पाणी कळंबोली व कामोठेला तर हेटवणेचे पाणी नेरुळ एमबीआरमधून शहराला देण्याचे पालिकेचे नियोजनाचा प्रस्ताव आहे.
स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असूनही शहराच्या काही भागांत कमी-अधिक पाणीपुरवठ्यामुळे पाणीसमस्येला जावे लागते. मोरबे धरण यावर्षी 24 सप्टेंबरला 100 टक्के भरले व धरणातून 19.087 क्युबिक मीटर पाण्याचा विसर्गही करण्यात आला. धरणात पाणी, परंतु पालिका क्षेत्रातील काही भागांत सातत्याने कमी-अधिक प्रमाणात पाण्याची ओरड सुरू असल्याने पालिकेने सिडकोकडून पाण्याचे देवाणघेवाण नियोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून दिवसाला जवळजवळ 500 एमएलडी पाणी उचलले जाते. परंतु, यातील काही पाणी एमआयडीसीभागाला, तर काही पाणी सिडको विभागाला व इतर पाणी नवी मुंबईकरांना पुरवले जाते.
पालिकेला सिडकोकडून नियमानुसार आवश्यक असलेले 80 एमएलडी पाणी मिळत नसल्याने पालिकेला बेलापूर ते दिघा या सर्वच विभागांना योग्य दाबाने पाणीपुरवठा करताना विविध भागात ओरड सुरू होते. त्यामुळे पालिकेने मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्यापैकी 15 एमएलडी पाणी कामोठे, कळंबोली या सिडको विभागाला देऊन त्याच्या मोबदल्यात सिडकोकडून हेटवणे धरणातून पालिका मुख्यालयासमोरून येणारे पाणी नेरुळ एमबीआर येथे घ्यायचे व त्या ठिकाणाहून पाणीतुटवडा जाणवत असेल त्या भागात देण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. त्यामुळे या मोरबे व हेटवणे धरणातून येणाऱ्या पाण्यातील 15 एमएलडी पाण्याची देवाणघेवाण करून पाणी समस्या दूर करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
मोरबे धरणापासून येणारे पाणी कळंबोली व कामोठेला दिल्यास हेटवणे धरणातून येणारे सिडकोचे पाणी नेरुळ एमबीआरमध्ये आणल्यास त्याचा पालिकेला उपयोग होणार असून नागरिकांना अधिक सुयोग्यरित्या पाणी देण्यात येईल असे पालिका प्रशासनाचे मत असून वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय येणार आहे. याबाबत सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रवीण मुळे यांना विचारणा केली असता याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
मोरबे धरणातील सध्याची पाणीस्थिती 2023-24 धरणात पडलेला पाऊस:- 3770.40 मि.मी. धरण पातळी:- 84.44 मीटर धरणातील जलसाठा:- 82.50 टक्के
नवी मुंबई शहरात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. मोरबे धरणाचे 15 एमएलडी पाणी सिडकोच्या कामोठे व कळंबोली नोडला देऊन त्यांच्या हेटवणे येथील धरणातून येणारे पाणी पालिकेकडे घेतल्यास नेरुळपासून ऐरोली दिघापर्यंत अधिक दाबाने पाणी देण्याचे नियोजन आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव मांडला असून, याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
राजेश नार्वेकर,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका







