नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

| अमरावती | वृत्तसंस्था |

अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला होता.

या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच त्यांना दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्‍वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला. नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या बरोबरच उच्च न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Exit mobile version