श्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम

| श्रीवर्धन | वार्ताहर |

दि. 26 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या नवरात्रोत्सवाची धामधूम श्रीवर्धन तालुक्यातही बर्‍याच ठिकाणी दिसून येत आहे. तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 32 सार्वजनिक ठिकाणी देवींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, 325 खासगी ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

श्रीवर्धन शहरामध्ये एकूण 10 ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरे केले जात आहेत. श्री सोमजाई देवी ही श्रीवर्धनची ग्रामदेवता असून, सर्वांचे श्रद्धास्थान आहे. येथे उत्सव काळात दररोज भजन व आरती मोठ्या भक्तीमय वातावरणात केली जाते. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या देवींच्या ठिकाणी विविध स्पर्धा, बक्षीस समारंभ आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व रात्रीच्या वेळी शासकीय वेळेचे बंधन पाळून मुख्यतः गरबा नृत्य अथवा दांडिया खेळणे हा तरुणाईच्या आकर्षणाचा भाग असतो.

श्रीवर्धन शहरात व जवळपास भैरवनाथ, काळेश्री देवी, मेटकर्णी देवी, थोडे दूर मंदिर असलेली कुसुमादेवी येथेही वेगवेगळ्या पद्धतींनी नवरात्रोत्सव साजरा केला जातो तर ब्राह्मण सभा, श्रीवर्धन या संस्थेच्या भजनांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो.

Exit mobile version