नवाब मलिक जे. जे. रुग्णालयात दाखल

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी अटक केल्यानंतर राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्या घरी सकाळी ईडीनं धाड टाकली होती. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणून अटक करण्यात आली. नवाब मलिक यांना सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आलं असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, आज नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यांनी पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक मंत्रीपदावर असल्यामुळे त्यांच्यावरील उपचारांसाठी सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर देखरेख करत असून जे जे रुग्णालयाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version