राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीकडून नेत्याचे ‘लाड’

। नेरळ । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणा़र्‍या माजी आमदार सुरेश लाड यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सुरू आहे.मात्र सुरेश लाड हे आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांचे वर्चस्व असलेल्या कर्जत आणि खालापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरणार्‍या इच्छुकांना जोरदार धक्का समजला जात आहे.कार्यकर्त्यांकडूनही भाऊ परत या, अशी विनवणी सध्या केली जात आहे.
सुरेश लाड हे खा.सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि स्थानिक कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून सुरेश लाड यांनी हा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला.
पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर सुरेश लाड यांनी एकांत मिळावा म्हणून आपले फार्म हाऊस गाठले.त्यात विविध भागातून येणार्‍या फोन कॉल्सकडे दुर्लक्ष करणारे सुरेश लाड यांचे बुधवारी सुनील तटकरे यांच्यासोबत बोलणे झाले. त्यावेळी तटकरे यांनी राजीनाम्याबाबत मला कल्पना द्यायला हवी होती आणि चर्चेने प्रश्‍न सुटले असते असे सांगून सुरेश लाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न तटकरे यांच्याकडून केला गेला.मात्र राज्यात आघाडीची सत्ता असताना एक आमदार तटकरे यांनी आव्हान देतो याबाबत आपण पक्षाला अनेकदा सांगून देखील पक्ष त्याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही अश नाराजीही त्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जाते.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावरच सुरेश लाड यांनी राजीनामा दिल्याने याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.त्यामुळे किमान कर्जत आणि खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना सुरेश लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले पाहिजेत अशीच इच्छा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची आहे.

Exit mobile version