कर्जतमध्ये राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी

आम्ही स्वतंत्र म्हणत आमदारकीचा निर्धार; महायुतीत अलबेल असल्याचा नेत्यांचा दावा

। नेरळ । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणूक संपली, त्याच संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने कर्जत विधानसभा मतदार संघात आपली दादागिरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात विळा भोपळ्याचे वैर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मैत्री (दि.13) मे रोजी संध्याकाळी संपली आहे. आता आम्ही महायुतीच्या जोखडातून मुक्त झालो असून कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला आहे. मात्र आता आम्ही स्वतंत्र असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकी मिळविण्यासाठी तयारी सुरू झाली आहे, असा जोरदार निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभेच्या दृष्टीने कामाला लागा, असा सल्ला ज्येष्ठांनी दिला असून सुधाकर घारे यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करण्याचा सूर राष्ट्रवादीच्या बैठकीत दिसून आला आहे. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिशन विधानसभा सुरू झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्यावतीने कर्जत तालुका कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे नेते सुधाकर घारे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, भरत भगत, तालुका अध्यक्ष भगवान चंचे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र निगुडकर, दीपक श्रीखंडे, अजय सावंत, रंजना धुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक पदाधिकारी यांनी लोकसभा संपली असून विधानसभेसाठी काही महिने शिल्लक असल्याने पक्षाच्या दृष्टीने कामाला लागा. दरम्यान राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी यांनी आपण महायुतीचे काम प्रामाणिकपणे केले मात्र मित्रपक्ष आपल्या नावाने उलट चर्चा करीत आहेत. मात्र येणार्‍या चार तारखेला सत्तेतील ग्रामपंचायतीमध्ये कोणाला मताधिक्य मिळेल, हे सिद्ध होईलच असे बोलून दाखवले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव यांनी आपल्याला सुधाकर घारे यांना आमदार करायचे आहे. त्यामुळे दिवस कमी असल्याने महायुतीचा विषय डोक्यातून बाजूला काढा आणि कामाला लागा असा सल्ला दिला. भरत भगत यांनी महायुती आपल्यासाठी 13 मे रोजी सायंकाळी संपली आहे. आपण सर्वांनी महायुतीचा धर्म पाळला आहे, तिकडे यजमान असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते मतदानाच्या वेळी काय करीत होते. हे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे चार जून रोजी महायुतीच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने युती धर्म पाळला आहे, हे दिसून येईल. पण तोपर्यंत त्यांच्या प्रमाणपत्राची आपल्याला गरज नाही, असे सांगून कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या दहापट अधिक काम सुधाकर घारे यांना आमदार करण्यासाठी करावे लागेल आणि त्यासाठी आमची सर्वांची तयारी आहे, असे यावेळी जाहीर केले.

या बैठकीत बोलताना सुधाकर घारे यांनी महायुतीमध्ये काय चालले होते. हे जाहीरपणे बोलायला लावू नका, असा सल्ला नाव न घेता दिला. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख जर कुस्ती करण्याचे आव्हान देत असतील तर आम्ही 2017 प्रमाणे यावेळी देखील तुमचे आव्हान लीलया परतवून लावू, असा विश्‍वास व्यक्त केला. निवडणुकीची सर्व मैदाने चितपट करण्यात आमचे कार्यकर्ते तयार असून सर्वांचे लक्ष्य निश्‍चित आहे आणि त्यामुळे आम्हाला कोणीही कोणत्याही धर्मसंकटात टाकू शकत नाही, हे कार्यकर्त्यांनी आजच आपल्या मनात ठरवून घ्यावे आणि कामाला लागावे असे निर्धार व्यक्त केला.

Exit mobile version