। श्रीवर्धन। वार्ताहर।
श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी झाली, तरी फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होईल,असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.हे वर्चस्व टिकविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ग्रामपंचायतीनंतर नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतर्फे जागा लढवण्याचे नक्की झाल्याचे बोलले जात आहे. जरी महाविकास आघाडी झाली तरी त्याचा स्पष्ट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच श्रीवर्धन तालुक्यात झालेला पाहायला मिळेल. श्रीवर्धन शहरामध्ये नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांची युती पक्की झाली आहे. अनेक शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवसेनेत आल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये असलेले शिवसैनिक महाविकास आघाडी मध्ये फारश्या जागा निवडून आणतील असे चित्र दिसत नाही. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा असेल, असे बोलले जात आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त जागा मिळतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.