| मुंबई | प्रतिनिधी |
छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार एनडीएत सहभागी होण्यासाठी तयार होते. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, यांचे सर्वांचे (अजित पवार गट) प्रयत्न होते की शरद पवारांना एनडीएत घेऊन जायचे. शरद पवार जर तयार असते, तर एनडीएत गेलेच असते. पण ते कधीच तयार नव्हते. शरद पवार यांनी भाजपाची विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. मात्र पक्ष फुटला तरी शरद पवार यांनी विचारधारा न सोडण्याचा निर्णय घेतला.
भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर टीका केली होती. राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे ते म्हणाले होते. यावरही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि मग आपण त्यातल्या एकाला नकली म्हणायचं. ज्यांनी फोडा-फोड केली त्यांनीच त्यात कोण असली आणि कोण नकली ठरवणं योग्य नाही. खरंतर कोण असली, कोण नकली, हे महाराष्ट्रातील जनतेला हे ठरवू दिलं पाहीजे. जनतेने हा निकाल घेतला आहे, तो मतपेटीतून दिसेलफफ, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.