सरकार कंफ्यूज ?

महाडमध्ये एनडीआरएफ की एसडीआरएफ

| रायगड | खास प्रतिनिधी |

आपत्तीचा मुकबला करण्यासाठी महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्ह्यात पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण होते. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा (एनडीआरएफ) तळ येथे उभारण्यास सरकार फारसे अनुकूल नसल्याचे चित्र आहे. त्याऐवजी या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलचा (एसडीआरएफ) तळ उभारण्याबाबत सरकार विचार करत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या गोंधळात जिल्ह्यावर आपत्ती येणार नाही ना याची दक्षता तातडीने घेणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा हा नेहमीच आपत्तीच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विशेष करुन महाड, पोलादपूर तालुक्यातील नागरिक तर जीव मुठीत घेऊन वास्तव्य करतात. 1989 साली पाली तालुक्यातील जांभुळपाडा येथे महापूर आला होता. त्याध्ये शेकडो नागरिकांचा जीव गेला होता, तर हजारो नागरिक बेघर झाले होते. त्यानंतर महाड तालुक्यातील पारमाची या गावामध्ये 1994 मध्ये पहिली दरड कोसळल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीला सुरुवात झाली. 2005 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यामध्ये दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन गावामध्ये दरड कोसळून 192 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये तळिये येथे दरड कोसळून 86 जणांचा मृत्यू झाला होता. तर, गेल्या वर्षी इर्शाळवाडीत दरड कोसळून 84 जण गाडले गेले. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफला सातत्याने पाचारण करावे लागत होते. जिल्ह्याला आपत्तीची अशी काळी किनार असल्याने महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफचा तळ असावा यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले. त्यानुसार महाड येथे सुमारे चार एकर जागा मंजूरदेखील करण्यात आली होती. एनडीआरएफचे तळ सुरु होणार असे वाटत असतानच अचानक या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.

पावसाळ्यामध्येच प्रामुख्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपत्तीच्या घडना घडत असतात. त्यामुळे अन्य महिन्यात एनडीआरएफ काय करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कायमस्वरुपी तळ देण्याबाबत सरकार फेरविचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याऐवजी त्याच जागेवर एसडीआरएफचा तळ उभारण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी सातत्याने आपत्तीच्या घटना घडत असतात. त्यामध्ये एखादी मोठी आपत्ती झाली, तर एनडीआरएफच्या पथकाला काय आयत्या वेळी बोलावणार का, असा प्रश्‍न आहे. शिवाय, तळिये येथे कोसळलेल्या दरडीमध्ये एनडीआरएफला पोहोचण्यास बराच कालावधी गेला होता. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे एनडीआरएफ की एसडीआरएफचा निर्णय सरकारने तातडीने घेणे गरजेचे आहे.

महाड येथे एनडीआरएफ की, एसडीआरएफचा तळ सुरु करणे याचा निर्णय सरकार घेणार आहे. जुलै महिन्यात आपल्याकडे एनडीआरएफचे पथक मदतीसाठी येणार आहे.

सागर पाठक,
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,
रायगड
Exit mobile version