| नागोठणे | प्रतिनिधी |
नागरिक आणि उद्योगांसाठी दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यामध्ये महामार्ग उभारणीची कामे सर्वत्र वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातासारखी दुर्घटना घडल्यास जखमींचा जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणीच महामार्गावर कुठेही झालेली नसल्याचे वास्तव आहे. माणगाव येथे मंजूर झालेले ट्रॉमा केअरही अद्याप कागदावरच आहे. त्यामुळेच या महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बांधकामाची मंजुरी घेताना या जागी ट्रॉमा केअर सेंटरचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील गंभीर अपघात, मोटार वाहनांची टक्कर, गंभीर किंवा प्राणघातक दुखापत झालेल्या प्रवाशांच्या उपचारांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज, तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी, अतिदक्षता विभाग, त्वरीत शस्त्रक्रियेची सोय, सुसज्ज रुग्णवाहिका असलेले रुग्णालय म्हणजे ट्रॉमा केअर सेंटर होय. तसेच, आपत्कालीन स्थितीत तातडीने सर्च वैद्यकीय उपचार देणारी ही विशेष सुविधा असते. अपघातात मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी जखमींना तातडीने उपचाराची गरज असते. अपघात झाल्यापासून 60 मिनिटांचा काळ हा जीव वाचवण्याच्या दृष्टीने ‘गोल्डन अवर’ मानला जातो. यासाठी ट्रॉमा केअर सेंटर महत्वाची भूमिका बजावताना दिसून येते. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे हद्दीत अनेक धोकादायक अपघात स्थळे आहेत. अपघातांचा हॉट स्पॉट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या ठिकाणांवर अनेकांचे बळी गेले आहेत. त्यातील बहुतांश मृत्यू हे वेळीच उपचार न मिळाल्याने झाले आहेत. नागोठण्याहून पनवेलला सुसज्ज हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर होते. त्यामुळे नागोठण्याला ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झाल्यास माणगाव, कोलाडपासून ते वडखळ पर्यंतच्या अपघातग्रस्त रुग्णांना त्याचा जीव वाचविण्यासाठी एक आशेचा किरण ठरणार आहे.
नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटरची गरज
