। माथेरान । वार्ताहर |
माथेरानमध्ये मागील काही वर्षांपासून हृदयरोग, अस्थमा, कॅन्सर, अर्धांगवायू अशा आजारांचा सामना करत आजही या व्याधींवर औषधोपचार घेण्यासाठी आर्थिक बाबतीत संघर्ष करावा लागत आहे. प्रदूषणमुक्त अशी माथेरानची ओळख जरी असली तरीसुद्धा अनेकजण या आजारांनी मृत्यू पावले आहेत. त्यासाठी इथल्या मातीमध्ये काही दोष आहेत का, याची तपासणी तज्ज्ञांच्या परीक्षणानुसार झाल्यास इथल्या स्थानिकांना दिलासा मिळू शकेल, असे बोलले जात आहे.
एकीकडे विपुल असणारी वनसंपदा लोप पावत चालली आहे. वारा वादळ नसताना सुध्दा अनेकदा झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मजबूत आणि रुबाबदार दिसणारी वृक्षवल्ली अचानक उन्मळून कशी काय पडतात, याचाही उलगडा होत नाही. यापूर्वी इथे बाहेरील आजारी पर्यटक शुद्ध हवा आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असणार्या याठिकाणी दहा ते पंधरा दिवस मुक्कामी राहून उत्तम प्रकारे ठीक होत असत. परंतु, सद्यस्थितीत पूर्वी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. यामागचे नेमके काय कारण असावे, या विवंचनेत स्थानिक नागरिक दिसत असून येथील मातीत प्रदूषणाच्या बाबतीत काही दोष आढळून येतात का, याचे परीक्षण तज्ज्ञांच्या मदतीने होणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.