सावधगिरी हवी

मंकीपॉक्स या आजारासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली. दरम्यान या आजाराचा चौथा संशयित रुग्ण दिल्लीत सापडल्याने तो भारतातही दाखल झाला आहे हे स्पष्ट झाले. त्यापूर्वी केरळमध्ये तीन संशयित रुग्ण आढळले होते. हे तिघे आखाती देशांमधून आले होते. त्यामुळे आजार त्यांनी आणला असावा असे मानायला जागा आहे. मात्र दिल्लीतील रुग्णाने असा प्रवास केल्याची नोंद नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. तेलंगणातही परदेशातून आलेला एक रुग्ण सापडल्याची ताजी बातमी आहे. अडीच वर्षांपूर्वी कोरोना हादेखील असाच चोरपावलांनी भारतात आला होता. आरंभी कोरोना भारतात पसरणार नाही अशी ग्वाही सरकारमध्ये बसलेले नेते आणि डॉक्टर्स देत होते. एकीकडे जगभरात प्रवासावर निर्बंध लादले जात असताना पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताचा जंगी कार्यक्रम अहमदाबादेत घेतला होता. कोरोना पसरायला इतर अनेक कारणांबरोबर तेही निमित्त झाले असावे असा अनेकांचा दावा आहे. त्यानंतर पहिली लाट संपल्यावर भारताने कोरोनावर मात केली अशी घोषणा तत्कालीन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली होती. त्यामुळे दुसर्‍या लाटेचा तडाखा बसला तेव्हा सरकार गाफील राहिले. अनेक लोक ऑक्सिजनअभावी रस्त्यावर मेले. त्या चुका पुन्हा होणार नाहीत अशी आशा आहे. मंकीपॉक्स हा देवीसारखा आजार असून 1970 च्या सुमारास तो आफ्रिकेत आढळून आला. ताप, डोकेदुखी आणि अंगावर चट्टे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. मात्र भारतीयांसाठी दिलाशाच्या दोन गोष्टी म्हणजे देवीची लस घेतलेल्यांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. आणि आपल्या देशात देवीची लस सार्वत्रिक दिली गेली आहे. पूर्वी, देवी रोगाची लागण कळवा आणि एक हजार रुपये मिळवा असे भिंतीभिंतींवर रंगवलेले असायचे. तेही आता गायब झाले आहे इतके त्याचे पूर्ण निर्मूलन झाले आहे. दुसरे म्हणजे मंकीपॉक्स हा हवेतून पसरण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे तो कोविड किंवा स्वाईन फ्लूसारखा भयावह नाही. मात्र रुग्णांच्या खूप जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तो होऊ शकतो ही काळजीची गोष्ट आहे. कारण, भारतामध्ये लोकसंख्येची दाटीवाटी असल्याने असा संपर्क टाळणे हे कठीण होऊन बसते. एकच बरी गोष्ट म्हणजे या आजारात मृत्यूचे प्रमाण कमी आहे. शिवाय, त्यावर थेट इलाज नसले तरी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. मुख्यतः रुग्णाने स्वतःला तीनेक आठवडे विलग करणे हे महत्वाचे आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आता असे विलग करण्याचे महत्व लोकांना पटलेले आहेच. कोरोना हा वटवाघळांपासून माणसांकडे आला असे मानले गेले. मंकीपॉक्स हादेखील प्राण्यांकडून माणसाला होणारा आजार आहे. माकडे, उंदीर,घुशी, खारी इत्यादींकडून याचा प्रसार होऊ शकतो हे लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. आजार झाल्यापासून चार दिवसांच्या आत देवीची लस दिली गेली तर हा तात्काळ आटोक्यात येऊ शकतो असे दिल्लीतील डॉक्टरांचे म्हणणे आहे. वेळेत इतर इलाज केले गेल्यास देवीसारखे व्रण राहत नाहीत असाही दिलासा त्यांनी दिला आहे. मात्र आधी स्वाईन फ्लू, मग कोरोना आणि आता मंकीपॉक्स अशा रीतीने संसर्गजन्य आजारांचा वाढलेला प्रसार ही चिंतेची बाब आहे. त्यातही कोरोनामुळे अनेकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली असल्याची भीती आहे. त्यांना अशा आजारांपासून जपायला हवे असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतातले पाचपैकी चौघे संशयित रुग्ण हे आखातातून आलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील अनेक जण आखातात कामाला आहेत. त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे तिकडे जाणेयेणे असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत विशेष खबरदारी घ्यायला हवी. या आजारसदृश लक्षणांवर लक्ष ठेवायला हवे आणि संबंधित कोणाकोणाच्या संपर्कात आले होते याचा पध्दतशीर मागोवा घ्यायला हवा. लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण न होता जागृती कशी घडेल हे पाहायला हवे.  महाविकास आघाडी सरकारने याबाबत चांगली कामगिरी केली होती. सध्या राज्य सरकारात दोनच मंत्री आहेत. राजकीय अस्थिरता आहे. प्रशासनावर त्याचा परिणाम होणार नाही अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version