पोलादपूरात लघुपाटबंधारे प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळण्याची गरज

| पोलादपूर । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी वसुधा जाधव यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांच्या मागणीनुसार पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील मंजूर झालेल्या प्रकल्पातील समस्या सोडविण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करून सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर आता पोलादपूर तालुक्यातील अन्य लघुपाटबंधारे प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.

राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी लघुपाटबंधारे स्थानिक स्तर उपविभाग माणगांव जि.रायगडच्या माध्यमातून सन 2008-2009 दरम्यान तयार केलेल्या टिपणी अहवालानुसार पोलादपूर तालुक्यातील विविध धरणांबाबत देवळे लघुपाटबंधारे योजना, लोहारे लघुपाटबंधारे योजना, तुर्भे खोंडा लघुपाटबंधारे योजना, किनेश्‍वरवाडी लघुपाटबंधारे योजना, चांभारगणी महाळुंगे लघुपाटबंधारे योजना, कोतवाल लघुपाटबंधारे योजना, कोंढवी साठवण तलाव आणि बोरघर लघुपाटबंधारे योजना सुरू होण्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानंतर या धरणांच्या कामांच्या निविदा अथवा कोणतीही कार्यवाही सुरू नसताना कथित ठेकेदार आणि त्यावर काम करण्यासाठी महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अशी यंत्रणा कागदोपत्री हलवाहलव करीत होती. मात्र, कोणत्याही योजनांचे प्रत्यक्षात काम सुरू झाले नसताना 2018 मध्ये जमिनी खरवडून माती काढण्यासोबतच दगडी आणि झाडे तोडून धरणाचे काम सुरू असल्याचा आभास सुरू झाला. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार्‍या मोबदल्याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत बैठका झडल्या. या बैठकांचे फलीत काहीच निष्पन्न नसताना गौणखनिज उत्खनन आणि वनविभागाच्या नियमांची अवहेलना मोठया प्रमाणात होत राहिली.

गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी काळातील भुस्खलनाच्या घटनांनंतर सर्वच लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या क्षेत्रामध्ये भविष्यात जमिनी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळण्यापूर्वीच दरडी कोसळून जर भुसंपादनाचा मोबदला मिळण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून तातडीने झाले नाहीत तर शेतकर्‍यांना उपयुक्त ठरणारी धरणे होण्याआधीच शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेली दिसून येणार आहेत.

राज्यातील महाआघाडी सरकारने तातडीने कोतवाल प्रकल्पाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील अन्य लघुपाटबंधारे प्रकल्पांची नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यास तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे चाकरमानी शेती करण्यास गांवी येऊन शेतीव्यवसाय वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version