मुंबई-गोवा महामार्गांवर अपघाताचा धोका वाढला
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 66 वरील सर्व दिशादर्शक फलकांजवळ सिग्नल नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात रस्ता क्रॉस करतांना विरुद्ध बाजूनी येणारी वाहने दिसत नाही. यामुळे वाहन चालकांसहित प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून या सर्व ठिकाणी सिग्नल बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अठरा वर्षांपासून सुरु असून अद्यापही काम अपूर्ण स्थितीत आहे. या मार्गांवरील इंदापूर, रातवड, तळवली, कोलाड, खांब, वाकण, नागोठणे या ठिकाणी दिशादर्शक फलक आहेत. परंतु या ठिकाणी रात्रीच्या अंधारात वाहन चालकांना वाहनांची दिशा बदलताना विरुद्ध बाजूने येणारी वाहने दिसत नसल्याने काही वाहने डिवाडरवर आदळून अनेक अपघात होत असून अनेकांचे नाहक बळी जात आहेत. तर अनेक प्रवाशी जखमी होत आहेत. याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व ठिकाणी सिग्नल बसविण्यात यावे, अशी मागणीही प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवर अनेक ठिकाणी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणचे काम अद्यापही बाकी आहे. परंतु, ज्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले; ते वर-खाली असल्यामुळे या ठिकाणी सिग्नल लावणे गरजेचे आहे. तसेच या मार्गावर सुकेळी खिंडीत रस्त्याला असणारी झाडे-झूडपे व वेडीवाकडी वळणे यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे या ठिकाणी सिग्नल लावले तर वाहनचालकांना वाहन चालविणे सोयीस्कर होऊन अपघातचे प्रमाण कमी होईल. या गोष्टीकडे त्वरित लक्ष देऊन योग्य त्या ठिकाणी सिग्नल लावण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.






