नीतिमत्तेचे राजकारण जिवंत ठेवण्याची गरजः आ.जयंत पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

नाना कुंटे, दत्ता पाटील, नारायण भगत, मधूकर ठाकूर यांनी आमदार म्हणून अधिवेशनात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एक वेगळे वर्चस्व अलिबागच्या आमदारांनी निर्माण केले होते. राजकारणामध्ये एक नीतिमत्ता होती. मलादेखील आमदार म्हणून अधिवेशनात विविध प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. परंतु सध्याचे राजकारण चुकीचे चालू आहे. टक्केवारी घेतली जात आहे. एक वेगळे वातावरण नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे नीतिमत्तेचे राजकारण जिवंत ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बुधवारी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. ॲड.उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आ.पंडित पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, काका ठाकूर, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सूनील थळे, बेलोशीचे सरपंच कृष्णा भोपी आदी मान्यवरांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.जयंत पाटील यांनी सांगितले की, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आल्यावर काय होईल याचे कारण सांगण्याची गरज नाही. इंडिया आघाडी एकत्र येऊन महाराष्ट्राचे राज्य पहिल्यांदा घ्यायचे आहे. त्यानुसार लोकसभेला काम करायचे आहे. एकतेचे वातावरण कायम ठेवले पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवण्याची गरज आहे. या भूमिकेतून सर्व एकत्र आलो आहोत. तळागाळातील सर्व कार्यकर्ते एकत्र करण्याची कामगिरी आपली सर्वांची आहे. पक्षापेक्षा इंडिया आघाडी म्हणून आपण काम केले पाहिजे, असे आ. जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version