कुसुमाग्रज,सी.व्ही रामन यांचे स्मरण आवश्यक -मिर्जी

मराठी भाषा दिन ,राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पीएनपीत विविध कार्यक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।

मराठी भाषा दिन अथवा राष्ट्रीय विज्ञान दिन हे औपचारिकपणे साजरे न करता या क्षेत्रासाठी योगदान दिलेल्या कुसुमाग्रज. सी.व्ही.रामन यांचे योगदानाचे स्मरण करणे उचित ठरेल,असे प्रतिपादन पीएनपीचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी यांनी केले. प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी आणि विज्ञान विभागातर्फे मराठी भाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, महाविद्यालायचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, पी. एन. पी. प्राथमिक मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, कला विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. रवींद्र पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.रसिका म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय मिर्जी यांनी मराठी भाषा दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतींचा उजाळा घेत विज्ञान दिनानिमित्त डॉ.सी.व्ही. रामन यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी थोर मराठी साहित्यिक आणि वैज्ञानिकांच्या आदर्शांचे अनुकरण केले पाहिजे असे आपले मत व्यक्त करत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालायचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी साहित्य आणि विज्ञान हे परस्परावलंबी व परस्परपूरक घटक असल्याचे आपले मत प्रतिपादित केले. मराठी भाषा दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ङ्गपृथ्वीचे प्रेमगीतफ या कवितेची सांगड विज्ञानाकडे कशी झुकते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मराठी विज्ञान साहित्याविषयी आपले निरीक्षण व्यक्त केले.

प्रास्ताविक कला विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी करत महाविद्यालयाच्या जडणघडणीत मराठी आणि विज्ञान विभागाचे योगदान कशाप्रकारे आहे याकडे आपले वक्तव्य करत उभय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमामध्ये टी. वाय. बी. ए. मराठी विषयाचा विद्यार्थी तेजस पाटील याने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाची सांगता झाल्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मिर्जी यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर मराठी विभागातर्फे बनविण्यात आलेल्या विशेष साहित्य कोलाजचे फीत कापून अनावरण डॉ. ओमकार पोटे आणि प्रा. नम्रता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संगणक विभाग प्रमुख तथा विज्ञान प्रदर्शन समन्वयक प्रा. निकिता पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता विज्ञान विभाग प्रमुख प्रा. रवींद्र पाटील यांनी केली.
छाया -अमोल नाईक

Exit mobile version