शेततळी, माशांमुळे रोजगाराच्या संधी
। रायगड । प्रतिनिधी |
पावसाळा सुरू झाल्यावर खोल समुद्रातील मासेमारी बंद होते. कोकणातील मत्स्य खवय्यांना या काळातही मासे उपलब्ध व्हावेत, यासाठी रायगड जिल्ह्यात मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्वच हंगामात बाजारात विविध प्रकारच्या माशांना चांगली मागणी आहे, हे ओळखून रायगडमधील अनेक शेतकर्यांनी भूजल मत्स्य व्यवसायात मोडणारी शेततळी, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसारखे प्रयोग यशस्वीपणे राबवले आहेत. हरितक्रांती, श्वेतक्रांतीनंतर आता नीलक्रांतीचे धोरण जाहीर करण्यास एकविसाव्या शतकाची वाट पहावी लागली. आता ही नीलक्रांती यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून शीतगृह, वातानुकूलित वाहन खरेदीवर येथील मच्छिमार भर देत आहेत. विविध प्रकारच्या मत्स्य उत्पादन आणि त्यासंदर्भातील उद्योगांमध्ये स्वतःला गुंतवून स्थानिक तरुणांनी ही नीलक्रांती घडवून आणली. 2015 पासून झालेले हे बदल रायगड जिल्ह्यात प्रकर्षाने दिसून येत असून नीलक्रांतीने आता जोर धरला आहे. यासाठी सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील औद्योगिक धोरणात बदल करून 2010 पासून प्रदूषणकारी रासायनिक कारखान्यांना मनाई करण्यात आली. जे रासायनिक कारखाने अस्तित्वात आहेत, त्यांना सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी प्लांट उभारणीची सक्ती करण्यात आली.
या कारखान्यांना शुद्धीकरणानंतरच कारखान्यातील सांडपाणी नद्या, समुद्रात सोडता येते. यामुळे पाताळगंगा, कुंडलिका, सावित्री नदीतील मत्स्यसंपदेचे जतन करण्यास सहकार्य झाले. नदीकिनारी हजारो कुटुंबांचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. त्याचबरोबर पारंपरिक शेती व्यवसाय करणार्या शेतकर्यांनी शासकीय अनुदानातून शेततळी, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसारखे प्रयोग यशस्वी केल्याने बारमाही मत्स्य उत्पादन करणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख निर्माण होत आहे.
रायगड जिल्ह्यात मत्स्यशेतीला भरपूर वाव आहे. येथे मुंबईसारखी मोठी बाजारपेठ आहे. पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद असते, अशा वेळी मत्स्य शेतीला चांगले दिवस आले आहेत. गोड्या आणि नीमखार्या पाण्यातील माशांना चांगली किंमत मिळत असल्याचे ओळखून पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेत शीतगृह, वाहतुकीसाठी वाहने, यासह व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
संजय पाटील, मत्स्यव्यवसाय उपायुक्त रायगड
राजन भगत, जिल्हा समन्वयक,
वाढती लोकसंख्या, सागरी मासेमारीच्या अस्थिरतेमुळे भूजल मत्स्यपालन करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अल्पभूधारक आणि नद्यांमध्ये मासेमारी करणार्या आदिवासी, पारंपरिक मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. खारभूमीमध्ये मत्स्यपालनास पोषक वातावरण असल्याने सरकारने येथे कारखाने न आणता रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी भूजल मत्स्यशेतीला अनुदान द्यावे.
श्रमिक मुक्ती दल