जागतिक स्पर्धेत सातत्य राखणार – नीरज

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता पुढील वर्षी होणार्‍या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत या कामगिरीत सातत्य राखण्याचे आपले उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने व्यक्त केली. 23 वर्षीय नीरजने देशासाठी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकले. आता पुढील वर्षी 15 ते 24 जुलैमध्ये होणार्‍या जागतिक स्पर्धेत त्याला सुवर्ण जिंकण्याचे वेध लागले आहेत. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर आता मी जागतिक सुवर्णाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. ऑलिम्पिक पदकानंतर जागतिक स्पर्धेतील जेतेपदाला क्रीडाविश्‍वात महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे मी एवढयावरच थांबणार नाही, असे नीरज म्हणाला.

नीरजने 7 ऑगस्ट रोजी सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधल्याने यापुढे हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाईल, असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) जाहीर केले. या दिवशी संपूर्ण भारतात विविध पातळ्यांवरील स्पर्धाचे आयोजन करण्यात येईल. त्याशिवाय आर्थिक परिस्थिती उत्तम नसूनही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांना मोफत भाला दिला जाईल, असेही महासंघाने स्पष्ट केले.

Exit mobile version