दोन पदकं जिंकून रचला इतिहास; ठरली पहिली भारतीय नेमबाज
| नागोया | वृत्तसंस्था |
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात पाचवे सुवर्णपदक आले आहे. नेमबाज नीरु ढंडा हिने सुवर्ण निशाणा साधत इतिहास घडवला आहे. तिने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. हे तिचे स्पर्धेतील दुसरे पदक ठरले आहे.
26 वर्षीय नीरु ही वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. विशेष म्हणजे हे सुवर्णपदक जिंकण्याच्या काही तास आधीच तिने महिला ट्रॅप सांघिक प्रकारात मनीषा कीर आणि आशिमा अहलावत यांच्यासोबत रौप्यपदक जिंकले होते. त्यांनी 328 गुणासंह पदक जिकंले होते. सांघिक प्रकारात चीनने (346 गुण) सुवर्णपदक आणि कुवेतने (325 गुण) कांस्य पदक जिंकले.
नीरु ही भारतीय लष्कराच्या नेमबाजी युनिटमधीलनायब सुभेदार असून, तिने गेल्यावर्षी आशियाई अजिंक्यपदाचे आणि यावर्षीच्या सुरुवातीला विश्व चषक शॉटगन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. खरंतर आत्तापर्यंत रायफल आणि पिस्तूल नेमबाजीच्या तुलनेत भारत शॉटगनमध्ये तितकी पदके जिंकत नाही. त्यामुळे तिचे यश विशेष आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीरुने तिचा चुलत भाऊ लक्ष्य शेओरन याच्याकडून प्रेरणा घेत नेमबाजीला सुरुवात केली होती. लक्ष्यने यापूर्वी 2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.दरम्यान, नीरूच्या अंतिम फेरीवेळी पाऊस असतानाही तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. नीरूने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत 28 गुण मिळवले. तसेच, 24 गुणांचा पूर्वीचा आशियाई विक्रम मोडला. या स्पर्धेत चीनची सन युनॉन्ग 26 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने तिने रौप्यपदक जिंकले. कुवेतच्या हाजर अब्दुलमलिकने 21 गुणांसह कांस्य पदक जिंकले.
नीरुने अंतिम सामन्याला दमदार सुरुवात केली होती. तिने पहिल्या फेरीतील सर्व पाच लक्ष्ये भेदली. परंतु, दुसऱ्या फेरीत तिचे एक लक्ष्य चुकले. मात्र, तिने लगेचच सावरत पुनरागनन केले. तिने तिसऱ्या फेरीत उत्कृष्ट निशाणा साधला आणि अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर तिने चौथ्या फेरीतही उल्लेखनीय कामगिरी केली. तिने चार फेरीनंतर 20 पैकी 19 शॉट्स हिट केले. अंतिम टप्प्यात तिने चांगला संयम राखला आणि अखेर सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. तत्पूर्वी आशियाई क्रीडा 2026 स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या शपथ भारद्वाजनेही अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही भारताला पदकाची आशा आहे. पुरुषांच्या सांघिक ट्रॅप प्रकारात शपथ भारद्वाज, किनान चेनई आणि अहवर रिझवी यांच्या भारतीय संघाला अंतिम फेरीत सहावे स्थान मिळाले.
