श्रीवर्धनमधील धरणांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

पाटबंधारे विभागाची पाठ, ग्रामस्थ संतप्त

। दिघी । वार्ताहर ।

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. सोमवारी सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद श्रीवर्धन तालुक्यात झाली आहे. त्यामुळे येथील नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. याशिवाय लहान-मोठया धरणांच्या पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील धरणांच्या देखभाल दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दूर्लक्ष झाले आहे. अतिवृष्टीच्या धोकादायक परिस्थितीत बघणार कोण असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे.

रानवली, मारळ, कुडकी, कार्ले, कोंढेपंचतन अशा लहान- मोठ्या धरणातून परिसरातील गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे धरणाच्या पाण्यावरच या गावांची तहान भागत असते. तसेच धरणांच्या परिसरात पाण्याचा पाझर होत असल्याने शेतीसाठी धरण उपयोगी ठरते. यातील काही धरण पूर्णतः मातीचे बनवलेले असून दोन-तीन धरणे लघुपाटबंधारे अखत्यारीत आहेत. अनेकदा जलसंपदा खात्याने काही ठिकाणाची धरण गळती आटोक्यात आणली. मात्र, सोमवारी तालुक्यात सर्वाधिक 245 मिलिमीटर पाऊस पडल्याने या अतिवृष्टीत ओव्हरफ्लो झालेल्या अनेक धरणातील पाणीपातळीचा निचरा अनेकांच्या शेतात होत आहे. दुसरीकडे नदीने पुररेषा ओलांडली असल्याने सर्वत्र पाणीच-पाणी झाले आहे.

येथील ग्रामस्थांचे दरवर्षी पावसाळ्यात शेतीचे नुकसान होत आहे. अनेक वेळा समस्या सोडवण्यासाठी शासनदरबारी व्यथा मांडण्यात आल्या. शासनाकडून अतिवृष्टीमध्ये ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचना देण्यात येतात. मात्र, यंदा अशा धोकादायक परिस्थितीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याच आरोप यावेळी कुडकी येथील ग्रामस्थांनी केला आहे.

कार्यालयच नाही

श्रीवर्धन तालुक्यात अंदाजे लहान-मोठी पाच धरणे आहेत. या धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दूर्लक्ष झाले असून, तालुक्यात पाटबंधारे विभागाचे कार्यालयच जागेवर नाही.

असाच पाऊस पडत राहिला तर आम्हा ग्रामस्थांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. समस्या सोडवण्यासाठी गेली तीन वर्षे पाटबंधारे विभागाशी पत्र व्यवहार करीत आहोत. ओव्हरफ्लो धरणातील पाण्याचा विसर्ग होत असलेल्या कालव्याचा बंधारा फुटल्याने गावाला पाण्याचा वेढा बसत आहे. त्यामुळे शेतीची मोठी नासाडी होत असून प्रत्येक पावसाळी जीव धोक्यात टाकून जगायला लागत आहे.

अदिती आगरी,
कुडकी सरपंच


Exit mobile version