| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदर परिसरातील फुंडे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या सीमा शुल्क विभागाच्या इमारती आजही वापराविना पडून राहिल्या आहेत. सदर इमारती परिसराला सध्या झाडा-झुडपांनी वेढले असून सरपटणार्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. एकंदरी वित्त मंत्रालयाच्या दुर्लक्षितपणामुळे सदर इमारतींवर खर्च करण्यात आलेला करोडोचा निधी वाया जातो की काय, असा सवाल जनमाणसात व्यक्त केला जात आहे.
देश परदेशातील मालाची आयात-निर्यात सुरळीत करणार्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांना, कर्मचार्यांना जेएनपीए बंदर परिसरात हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने फुंडे ग्रामपंचायत हद्दीत पाच मजली आठ इमारतीची उभारणी करोडो रुपये खर्च करून दहा वर्षापूर्वी केली आहे. मात्र, सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी आपला संसार सदर इमारतींमध्ये न थाटता नवीमुंबई, मुंबई शहरात थाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे करोडो रुपयांचा निधी खर्च करुन उभारण्यात आलेल्या इमारती या जैसे थे स्थित धूळ खात पडून राहिल्या आहेत.
सदर इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत असून या इमारतींचा, परिसराचा ताबा हा झाडा-झुडपांनी घेतला असून याठिकाणी सरपटणार्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. तरी वित्त मंत्रालयानी व जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने पडीक इमारतीची पाहणी करून इमारतीचा वापर हा कर्मचारी रहिवाशी संकुलासाठी करावा जेणेकरून करोडो रुपयांचा खर्च करण्यात आलेला निधी वाया जाणार नाही अशी मागणी जनमाणसातून करण्यात येत आहे.
सदर इमारतीत कोणी ही राहत नसले तरी या इमारतींचा वापर हा सीमा शुल्क विभाग बंदर कार्यालयातील कागदपत्रे, फाईल ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क कार्यालय जेएनपीए बंदरकडून प्राप्त होत आहे.