महावितरणचा दुर्लक्षित कारभार

मुरावाडीतील उघड्या डीपीमुळे जीवितास धोका


| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्याजवळील मुरावाडी येथे रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या डीपीला झाकण नसल्यामुळे ही उघड्या अवस्थेतील ही डीपी धोकादायक बनली आहे. याबाबत मुरावाडी येथील ग्रामस्थांनी एक वर्षापूर्वी तक्रारी अर्ज केला होता. ग्रामस्थांनी वेळोवेळी नागोठणे महावितरण कार्यालयात जाऊन पाठपुरावा करूनही महावितरण कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या धोकादायक डीपीमुळे जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

मुरवाडी येथील धोकादायक व उघड्या अवस्थेत असलेली डीपी ही गावातील रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे तेथे नेहमी वावर असलेले नागरिक, लहान मुले व गुरेढोरे यांच्यासह ग्रामस्थांची जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत महावितरणच्या नागोठणे कार्यालयाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुरावाडी ग्रामस्थांकडून होत आहे. यासंदर्भात महावितरण कंपनीचे नागोठण्यातील सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच याठिकाणच्या डिपीवर झाकण बसविण्याची उपाययोजना करण्यता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version