। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड -मुंबईला जोडणार्या महत्वाच्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे सदरचा प्रवास करताना प्रवाशी मात्र भीतीने प्रवास करताना दिसत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना विहूर पुलावरून मुंबईकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे.परंतु अतिवृष्ठीमुळे या पुलाकडील संरक्षक भिंती मधील माती वाहून गेल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे.
जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे हि माती ज्यावेळी वाहून गेली होती त्यावेळी तातडीने या पुलाच्या डागडुगी करून सदरचा भराव भरून सदरचा पूल पूर्वस्थितीत आणला गेला होता. 8 सप्टेंबर रोजी 547 मिलीमीटर एवढा पाऊस बरसल्याने पुन्हा त्याच जागेतील माती वाहून गेल्याने पूर्वी पेक्षा मोठा खड्डा तयार झाला आहे.सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरु आहे परंतु येथे दिवसाला 60 ते 50 मिलीमीटर एवढा पाऊस बरसत असल्याने हळू हळू पडलेला खड्डा मोठा होत आहे.त्यामुळे दुर्लक्ष झाल्यास मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर वेळीच सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष न दिल्यास येथे अपघात होऊन येथील वाहतूक कायमची बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







