पुनाड्यात सापडल्या दुर्लक्षित वीरगळी

आठशे वर्षांचा इतिहास येणार उजेडात


| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील पुनाडे गावात तब्बल आठशे वर्षांपूर्वीच्या वीरगळी सापडल्या आहेत. या वीरगळी एका शेतमाळावर दुर्लक्षित अवस्थेत होत्या. त्यांच्या संशोधनातून आठशे वर्षांच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडणार आहे. दरम्यान, खाडी किनारी असलेल्या या वीरगळी उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर कोकण इतिहास परिषदेने आता संशोधन सुरू केले आहे. वीरगळ म्हणजे पाषाणावर कोरलेली वीरांची लढाई टिपणारी युद्धाची क्षणचित्रे.

पुनाडे गावातील एका शेतमाळावर आणि खाडीकिनारी दोन वीरगळी असल्याची माहिती उरण येथील अभ्यासक, शिक्षक तुषार म्हात्रे यांनी कोकण परिषदेचे रायगड शाखेचे अध्यक्ष व पुरातत्त्व अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांना दिली. त्यानुसार धनावडे यांनी या शिल्पांची आणि परिसराची पाहणी केली. पुनाडे गाव उरणपासून 18 किलोमीटर अंतरावर असून, गावदेवी बहिरी देवळाजवळ शेतात हे तीन विरगळ उभे केले होते. हे वीरगळ या परिसरात मामा-भाचे म्हणून ओळखले जातात. वरच्या भागाच्या वीरगळींवर युद्ध करत असलेले दोन वीर दिसत असून, खालच्या चित्रात धगधगत्या रणांगणात युद्ध करणारा वीर दिसत आहे. मधल्या भागात तहाच्या बोलणीच्या प्रसंगाचे चित्र दिसून येत आहे. शीर्षभागी मंगल कलश असलेल्या वीरगळीची उंची अडीच फूट असून, ती चार टप्प्यांत आहे. त्यातील एक वीरगळ पूर्ण भग्न अवस्थेत आहे ,तर दोन वीरगळींची झीज झालेली आहे. सर्वात वरच्या टप्प्यात स्वर्गप्राप्ती झालेला वीर शिवलिंगाची उपासना करताना दिसत आहे. वीरगळीवर दाखविलेल्या लाकडी नौका, युद्धनौका नसून, त्या साध्या पद्धतीच्या आहेत.

मातीची खापरे सापडली
याच ठिकाणी सुमारे आठशे वर्षांपूर्वी वापरल्या गेलेल्या खापरांचे अवशेष सापडले आहेत. खापरे म्हणजे पुरातन वापरलेली काळ्या मातीची भांडी. भांड्यांचे अवशेष काचेचे लेप असलेली रंगीत तेजस्वी लाल, पांढरे चमकदार, पांढऱ्यावर निळ्या रंगाची नक्षी अशी पूर्व मध्ययुगीन खापरे आढळून आली आहेत.

गद्यगळीचा शोध
उरण तालुक्यातील पिरकोन येथे वीरगळी तर चिरनेर रानसई येथे गद्यगळी सापडल्या आहेत. या परिसराचा सखोल अभ्यास करून, कोकण इतिहास परिषद या दुर्लक्षित इतिहासावर नक्कीच प्रकाश टाकेल, असा विश्वास इतिहास संशोधक डॉ. अजय धनावडे यांनी व्यक्त केला. कोकण इतिहास परिषदेच्या या शोधमोहिमेत तुषार म्हात्रे, विजय गावंड, अभिषेक ठाकूर, महेश पाटील यांचा सहभाग आहे.

Exit mobile version