नारळ पाडणे बनले उपजिविकेचे साधन
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
उंच माडावरील नारळ पाडण्याची कला काही औरच आहे. सरसर उंच माडावर चढून पानाचे आड लपलेले नारळ अलगद दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचे काम कोकणातील पाडेकरी अर्थात पुरुष मंडळी करतात. पण रत्नागिरीच्या नेहा पालकरने आता या शास्त्रशुद्ध प्राविण्य मिळवित नारळ पाडण्याचे शिक्षण घेतले आहे. अशाप्रकारे माड खाली उतरविणारी युवती अशी तिची नव्याने ओळख झाली आहे.
नेहा पालेकर हिच्या घराशेजारी असलेल्या झाडांवरील नारळ काढण्याचा प्रश्न काही वर्षांपूर्वी निर्माण झाला तेव्हा तिच्या आजीने (रजनी पालेकर) तू याचं काही प्रशिक्षण घेता आलं तर बघ. निदान आपल्या झाडांची साफसफाई व नारळ काढता येतील, असे नेहाला सुचवले. त्यानुसार नेहाने भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रामध्ये जाऊन जुजबी कौशल्य प्राप्त केले. पण तिचे तेवढ्याने समाधान झाले नाही. म्हणून याबाबत जास्त शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी ती केरळला गेली आणि तेथील नारळ संशोधन केंद्रामध्ये सहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे नारळाच्या झाडावर चढणे, त्याची साफसफाई करणे, त्यावर पडणार्या रोगांची माहिती करून घेणे, रोगांवरील उपाययोजनांची माहिती घेऊन येणार्या अडचणींची माहिती तिला मिळाली. तेथून गावी परत आल्यानंतर तिने आपल्या झाडांसह आसपासच्या लोकांच्या झाडांवरील नारळही काढून देण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यामध्ये प्रावीण्य मिळवले.
याबाबत नेहाने सांगितले की, प्रथम मी माझ्या आवारातील नारळाच्या झाडावर चढून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिरजोळे, सापुचे तळे इत्यादी भागांत काम केले. या प्रशिक्षणाकडे कोणीही फिरकत नाही. हे काम जोखमीचे आहे. मात्र आपल्या उपजीविकेचे साधन ठरेल एवढी या कामाला मागणी आहे. दिवसाला दहा झाडांवरील नारळ काढले तरी सहजगत्या हजार रुपये मिळतात. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष परिक्षेत्रामध्ये जाऊन आतापर्यंत पाचशे ते सहाशे नारळाच्या झाडावर चढून प्रत्येकाला समाधानकारक काम करून दाखवल्यामुळे प्रशिक्षणाचा चांगला उपयोग होत असल्याचे तिने नमूद केले.
नवे करण्याचा ध्यास
काहीतरी नवे करण्याचा अन् त्यात पारंगत होण्याचा माझा स्वभाव असल्याने आवड नसतानादेखील आजीच्या शब्दाखातर प्रशिक्षणासाठी गेले. त्यामध्ये गांडूळखत आणि इतर गोष्टींचं प्रशिक्षण मिळाले. त्यात प्रामुख्याने मुलींना प्राधान्य आहे. मीही प्राधान्य दिले आणि त्यातून आवड निर्माण झाली. आजपर्यंत या प्रशिक्षणाकडे कोणतीच मुलगी फिरकली नव्हती; वेगळे करण्याची माझी मानसिकता असल्याकारणाने त्यात मला यश मिळाले.