महिलेला अटक
| ठाणे | प्रतिनिधी |
विरारच्या जे.पी. नगर परिसरात पाण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा पेटला की, संतापाच्या भरात महिलेने डासांचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. उमेश पवार (53) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कुंदा तुपेकर (47) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
विरारमधील जेपीनगर भागात अनेक गृहसंकुले असून तेथे पालिकेच्या सार्वजनिक नळावरून नागरिकांना पाणी भरावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने अनेकदा नळावर गर्दी होते, रांगा लागतात. त्यातून वादही होतात. 15 क्रमांकाच्या इमारतीमध्ये शेजारी राहणारे उमेश पवार व कुंदा तुपेकर यांच्या कुटुंबात नेहमी खटके उडायचे. मंगळवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण एवढे वाढत गेले की कुंदा तुपेकर हिने घरातून डास मारण्याचा स्प्रे आणून तो थेट उमेश पवार यांच्या तोंडावर मारला.
विषारी स्प्रे तोंडावर मारल्याने उमेश पवार बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यांच्या कुटुंबाने रहिवाशांच्या मदतीने त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन कुंदा तुपेकर यांना अटक केली. अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्येचा अधिक तपास सुरू आहे. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणाने शेजाऱ्याची हत्या झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.







