नेरळ पोलिसांकडून आरोपी महिलेचा पर्दाफाश
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजारधर्माला काळिमा फासणारी व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शेजाऱ्यांच्या शुल्लक वादातून थेट अडीच वर्षांच्या निरागस चिमुकल्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. शेजाऱ्याची मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला मारले, अशी धक्कादायक कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिने पोलिसांसमोर दिली आहे. जयदीप गणेश वाघ (अडीच वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या घटनेचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
9 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी गणेश वाघ व पत्नी पुष्पा हे दोघे मजुरीसाठी कामावर गेले असताना त्यांची मुले घरासमोर खेळत होती. याचवेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी जयवंता मुकणे हिने ईर्षा व रागातून जयदीपला उचलून पाठीमागील पायवाटेजवळ नेले आणि गळा आवळून त्याला ठार केले. यानंतर तिने मुलगा बेशुद्ध झाल्याचे नाटक करत हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण केला. मुलगा मृत आढळताच त्याला त्याच्या आईने कळंब रुग्णालयात नेले होते. परंतु त्याला उपस्थित डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबाने परंपरेनुसार त्याचे अंत्यसंस्कारही करून टाकले.
परंतु, एका जागरूक नागरिकाने पोलिसांना गुप्तपणे माहिती दिल्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा धागा सुटला. माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची पोलिस टीम हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीपासूनच मुलाच्या मृत्यूबाबत संशय बाळगणाऱ्या ढवळे यांनी तपासाची दिशा बदलणारी महत्त्वाची पावले उचलली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार, तसेच कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने मृतदेह पुन्हा कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मुलाचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. कर्जत तालुक्यात या अमानवी घटनेने प्रचंड संतापाची लाट उसळली असून आरोपी महिलेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिस तपास सुरू असून पुढील दुवे शोधण्याचे काम सुरू आहे.
याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली असून 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
मृत मुलाच्या मोठ्या बहिणीलाही मारण्याचा प्रयत्न
या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी आरोपी महिलेने मृत मुलाच्या 4 वर्षांच्या मोठ्या बहिणीचाही गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न फसला आणि दुसऱ्या दिवशी मुलगा एकटाच आढळताच आरोपीने त्याचा जीव घेतला. पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे आरोपी जयवंता मुकणे हिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिलेला देखील तीन मुले आहेत. दोन जुळे मुले (दीड वर्षांचे) आणि एक मोठा मुलगा बहिणीला दत्तक दिलेला आहे.







