ना धनुष्यबाण, ना कमळ; आ. गोगावले पुन्हा चर्चेत

| पोलादपूर | विशेष प्रतिनिधी |

मतदारांनी शिवसेनेचे धनुष्यबाण, भाजपचे कमळ शोधू नये तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडयाळासमोरचे बटन दाबावे, या आ. गोगावलेंच्या विधानामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मंत्रिपदावरुन स्वतःचे हसू केल्यानंतर नाराज असलेल्या आ. गोगावले यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्याचा संकेत तर दिला नसावा, अशा चर्चांना उधाण आले आहे.

पोलादपूर येथील खा. सुनिल तटकरे यांच्या प्रचार सभेत आ. भरत गोगावले यांनी ज्यांच्यामुळे गद्दारी करावी लागली, ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, अशा सुनिल तटकरे यांच्यासाठीच जनतेला आवाहन केले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. आदिती तटकरेंच्या पदरात मंत्रीपद पडल्यानंतर गोगावलेंचा तिळपापड झाला. त्यावेळी महिला म्हणून त्या पद सांभाळण्यास अकार्यक्षम ठरतील, असा दावाही त्यांनी केला. या विधानामुळे ते बराच काळ चर्चेतही राहिले. एकढं करुनही त्यांच्या नशिबात मंत्रीपद काही आले नाही. अशातच प्रचार सभेत मतदारांनी शिवसेनेचे धनुष्यबाण किंवा भाजपाचे कमळ शोधू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडयाळासमोरचे बटन मतदारांनी दाबावे, असे आवाहन आ.गोगावले यांनी केले. त्यामुळे मंत्रीपदासाठी गोगावले पक्षप्रवेश तर करणार नाही ना?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आ.गोगावले यांना मंत्री करताना अडथळा करु नका
खा.तटकरे यांनी पुन्हा लोकसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करीत असल्याचे विकास गोगावले यांनी सांगितले. मात्र आ.गोगावले यांना कुठेही मंत्री होण्यास अडथळा होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अदिती आमची बहिणच आहे, असे सांगत तिला रायगड आमच्यासाठी सोडून राज्यामध्ये काम करण्यास सांगू, अशी भुमिकाही विकास गोगावले यांनी मांडली.

आ.गोगावले यांच्या मंत्री होण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नव्हती. मंत्रीपदाच्या पहिल्या यादीमध्ये नाव असूनही दुसऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्याचा त्याग आ.भरतशेठनी दाखविल्यामुळेच ते मंत्रीपदापासून वंचित राहिले आहेत. आ.भरतशेठ त्यागमुर्ती आहेत.

खा. सुनील तटकरे
Exit mobile version