खुनात मामीचाही सहभाग
दोन वर्षांनंतर खुनाचा झाला उलघडा
| खोपोली | प्रतिनिधी |
जमिनीचा पैसा हडपण्यासाठी भाच्याने मामाचा थंड डोक्याने काटा काढला. मात्र, पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध लावत कायद्याचे हात तोकडे नसल्याचे दाखवून दिल्याने खालापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचताच याचा प्रत्यय खालापूर पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.1 जुलै 2020 रोजी खालापूर पोलिसांना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चौकनजीक अंदाजे 50 वर्षे वयाचा इसम मृतावस्थेत सापडला होता. मृतदेहाची कोणतीही ओळख पटेल असा पुरावा नसल्याने पोलिसांनी बेवारस नोंद करत मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला होता. मृतदेहाचा ताबा घेण्यास कोणीही पुढे न आल्याने पोलिसांनी नियमानुसार अंत्यसंस्कार केले होते.
या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत असतानाच अनपेक्षितरित्या प्रकरणाचा खुलासा होत चौक येथे जुलै 2020 मध्ये सापडलेला मृतदेह हा सावकार तात्याबा घुले (रा. निमदरी विकासवाडी, सावरगाव-पुणे) या व्यक्तीचा असून, सावकार याची जमीन हडपण्यासाठी त्याचा भाचा गणेश देवराम दरेकर (रा. गुंजाळवाडी नारायणगाव) आणि सावकारची दुसरी पत्नी पल्लवी विठ्ठल चिलवंत (रा. कोपरखैराणे, नवी मुंबई, सध्या रा. कळवा, जि. ठाणे) यांनी कटकारस्थान करून त्याचा खून केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे, सावकार तात्याबा घुले याचा खोटा मयत दाखलादेखील 2020 मध्ये पल्लवी, गणेश यांनी तयार करून घेतला होता.
सावकार घुले हा पहिल्या पत्नीपासून विभक्त राहात होता. भाचा गणेशाला मामाच्या नावे असलेल्या जमिनीची माहिती होती. ही जमीन विकून पैसा कमवायच्या हेतूने गणेशने प्लान तयार केला. यामध्ये त्याने पल्लवी हिलादेखील सामील करून घेतले. गणेशने सावकार याला कामानिमित्त कोपरखैरणे येथे आणून पल्लवीसोबत ओळख करून दिली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर गणेशने दोघांचे लग्न लावून दिलं होतं. सावकार घुले याच्या नावे असलेली जमीन विक्री करून त्यामधून आलेले पैसे हडप करण्यासाठी गणेश आणि पल्लवी याने सावकार याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार 1 जुलै 2020 रोजी रिक्षातून जेवणासाठी तिघेजण बाहेर गेले. त्यावेळी गणेशने पाण्यातून झोपेच्या गोळ्या सावकार याला दिल्या. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. रिक्षाने तिघेजण जुन्या मुंबई महामार्गानि चौकजवळ आल्यानंतर पल्लवीने पती सावकारला रिक्षातून ढकलून दिले होते. त्यात सावकाराच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला होता. गणेश आणि पल्लवीने राजपाल हॉस्पिटल, नवी मुंबई येथील मृत्यूची खोटी कागदपत्रे तयार करून त्या कागदपत्रांचे आधारे नवी मुंबई महानगरपालिका विभाग कोपरखैरणे येथील खोटा मृत्यूचा दाखला बनविला होता.
सावकार घुले यांच्या नावे असलेली जमीन कैलास घुले यांना विक्री करण्यात आली होती. कैलास घुले यांनी वारस नोंद होण्यासाठी अर्ज दाखल केला असता, सावकार याचा भाऊ संपत तात्याबा घुले याला माहिती मिळाली. चौकशी केली असता गणेश, पल्लवी याने सावकारचा आजारपणात मृत्यू झाल्याचे सांगितले. सावकाराच्या भावाला संशय आल्याने पोलिसात तक्रार केली. तपासात नवी मुंबई म.न.पालिका विभाग कोपरखैरणे येथून सावकार घुले यांचा मृत्यूचा दाखला दिल्याची कोणतीही नोंद नसल्याचे समोर आल्याने संशय अधिक बळावत गेला. सावकार याचा मयत दाखला खोटा असल्याचे समोर आले आणि गणेश पल्लवीचे बिंग फुटले.